खून प्रकरणी तिघांना अटक

0
96

तळेगाव, दि. १५ (प्रतिनिधी)

दारू पिऊन आपल्‍या आई वडिलांना त्रास देतो, या कारणावरून एका महिलेने आपल्‍या मावस भावांना सोबत घेऊन एका तरुणाचा खून करून पुरावा नष्‍ट केला. मावळ तालुक्‍यातील नानोली येथे २६ ऑक्‍टोबर रोजी घडलेल्‍या या खून प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.

सोमनाथ रघुनाथ काळे (वय ३६, रा. नानोली, ता. मावळ, जि.पुणे) असे खून झालेल्‍या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक शाम तुकाराम मस्के (वय ४५) यांनी गुरुवारी (दि. १४) तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ब्राम्हणवाडी, ता. मावळ, जि.पुणे येथे राहणार्‍या एका ४० वर्षीय महिलेसह तिचे मावसभाऊ मंगेश गोविंद दाभाडे (वय ३६) आणि तनेष साईनाथ दाभाडे (वय १९, दोघही रा. कोटेश्वरवाडी, ता. मावळ, जि.पुणे) यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, मयत सोमनाथ हा दारु पिऊन येवून आपल्या आई वडिलांना त्रास देतो या कारणाने महिला आरोपी हिने चिडून सोमनाथ याचा खून करण्यासाठी आपला मावस आरोपी मंगेश आणि तनेष यांना दि. २६ ऑक्‍टोबर रोजी नानोली येथे मयताचे रहाते घरी बोलावून आपसांत संगणमत करुन सोमनाथ याच्‍या खुनाचा कट रचला. सोमनाथ दारुच्‍या नशेत असल्याचा गैरफायदा घेवून त्‍यांचा पायाने गळा दाबून खून केला. तसेच सोमनाथ हा दारुचे नशेत मयत झाला असल्याचा बनाव करुन मयताचे प्रेताची विल्‍हेवाट लावून पुरावा नष्‍ट केला. तळेगाव एमआयडीसी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.