निगिड,दि. 4 ऑगस्ट (पीसीबी) -निगडी परिसरातील सराईत गुन्हेगार दाद्या गवळी आणि त्याच्या साथीदारावर खुनी हल्ला करत त्यातील एकाचा खून केल्या प्रकरणात फरार असलेल्या आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने पुणे शहरातून अटक केली या गुन्ह्यातील आरोपींवर पोलिसांनी मोक्का देखील लावला होता.सुरज ऊर्फ डोरेमोन नागनाथ चंदनशिवे (वय 27, रा. आंकुश चौक, निगडी, पुणे. मूळ रा. वडगावलाख, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
सराईत गुन्हेगार दाद्या गवळी, आकाश धुनधव आणि त्याचे साथीदार 11 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री सव्वा दहा वाजताच्या सुमारास त्याच्या घरासमोर गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी तिथे काळ्या उर्फ शाहिद पठाण, सुरज चंदनशिवे उर्फ डोरेमॉन, शाहनवाज शेख उर्फ शहाण्या, जावेद शेख, शाहिद शेख आणि इतर चारजण आले.
आरोपींनी आनंद आणि आकाश यांना शिवीगाळ केली. त्यानंतर जीवे मारण्याच्या उद्देशाने दोघांच्या छातीवर, पोटावर चाकू, कोयत्याने वार केले. सिमेंटच्या गट्टूने मारहाण करून दोघांना गंभीर जखमी केले. जखमी आकाश आणि आनंद यांना पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, आनंद गवळी याच्या आईने निगडी पोलीस ठाण्यात खुनी हल्ल्याची फिर्याद दिली होती. फिर्याद दिल्यानंतर काही वेळातच आकाश धुनधव याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
त्यावेळी पोलिसांनी इतर आरोपींना अटक केली. मात्र सुरज चंदनशिवे हा फरार होता. दरम्यान, पोलिसांनी सुरज चंदनशिवे आणि टोळीवर मोक्काची कारवाई केली त्यातही तो फरार होता. त्याच्या मागावर पोलीस पथके होते अखेर तो खंडणी विरोधी पथकाच्या जाळ्यात अडकला. तो पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आला असल्याची माहिती खदानी विरोधी पथकातील पोलीस हवालदार आशिष बोटके यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन त्याला अटक केली.
आरोपी सुरज चंदनशिवे याच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात जबरी चोरी, निगडी पोलीस ठाण्यात खून, मारहाण आणि दारू विक्री प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. त्याला निगडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.