खून करून बिहारला पळून जात असलेल्या दोघांना मानपाडा मधून अटक

0
61

हिंजवडी, दि. १९ (पीसीबी)

पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून बिहार वरून पुण्यात येत एका तरुणाचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून करण्यात आला. बावधन पोलीस चौकी जवळील नर्सरीमध्ये बुधवारी (दि. 18) मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

राजीवकुमार सिंह (वय 33) आणि धीरजकुमार रमोदसिंग (वय 20, दोघे रा. मुजफ्फरनगर बिहार) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. प्रवीणकुमार महतो (वय 25, मूळ रा. मुजफ्फरनगर बिहार) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, नर्सरी मध्ये एका तरुणाचा गळा चिरून खून केल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना एका नागरिकाने कळविली. बावधन चौकी जवळ असलेल्या एका नर्सरी मध्ये प्रवीण महतो याचा धारदार हत्याराने झोपेत असतानाच गळा चिरून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले.

प्रवीण याच्याकडे एका बड्या कंपनीचे गार्डनिंगचे कंत्राट होते. त्यामुळे या खुनामागे व्यावसायिक वाद आहे का हे तपासले जात होते. मात्र तसे काहीच आढळून आले नाही. त्यानंतर ह्याचे वैयक्तिक संबंध कोणाबरोबर कसे आहेत हे तपासात असताना राजीवकुमार बाबत माहिती मिळाली. पोलिसांनी सूत्रे हलवून तत्काळ दोघांना ताब्यात घेतले. राजीवकुमार महतो याला त्याच्या पत्नीसोबत प्रवीण महतो याचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्या कारणावरून त्याने त्याच्या एका साथीदारासोबत मिळून प्रवीणला ठार मारण्याचा विचार केला. प्रवीण झोपेत असताना त्याचा गळा चिरून खून केल्याचे प्राथमिक तपासातून उघड झाले आहे.

खून केल्यानंतर राजीवकुमार आणि धीरजकुमार हे दोघे मानपाडा मार्गे पुन्हा बिहार येथे पळून जाण्याच्या तयारीत होते याबाबत हिंजवडी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर हिंजवडी पोलिसांनी मानपाडा येथे जाऊन दोघांना अटक केली.

प्रवीण याचा खून करण्यासाठी राजीव कुमार हा बिहार वरून पुण्यात आला. त्यानंतर त्याने साथीदाराला घेऊन अनैतिक संबंधाच्या संशयावरून प्रवीण याचा खून केला.

प्रवीण आणि राजकुमार राजीव कुमार यांच्या पत्नीचे अनैतिक संबंध मागील चार वर्षापासून असल्याचा संशय राजीवकुमार याला होता. यावरून त्यांच्यात वादही झाले होते. मागील महिन्यात प्रवीण आणि राजीवकुमार याच्या पत्नीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर संशय बळावत गेल्याने राजीवकुमार पुण्यात आला आणि त्याने हा खून केला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.