खासदार श्रीरंग बारणे यांचे संरक्षण मंत्र्यांना साकडे

0
4

पिंपरी दि . २८ ( पीसीबी ) – पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचा पुणे महापालिकेत समावेश केल्याप्रमाणे देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश करण्याची मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे केली. त्यावर याबाबत राज्य शासनाने प्रस्ताव पाठवावा. हा प्रस्ताव आल्यास देहूरोडचा महापालिकेत समावेश करण्याची ग्वाही संरक्षण मंत्री सिंह यांनी दिल्याचे बारणे यांनी सांगितले.

खासदार श्रीरंग बारणे यांनी दिल्लीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरातील नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविण्यात कमी पडत आहे. त्यामुळे देहूरोडचा पिंपरी महापालिकेत समावेश करण्याची विनंती केली. खासदार नरेश म्हस्के यावेळी सोबत होते.

खासदार बारणे यांनी म्हटले आहे की, मावळ लोकसभा मतदारसंघात देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचा समावेश आहे. देहूरोड छावणी ऐतिहासिक आहे. सैन्य, नागरिकांसाठी काम करित आहे. गेल्या काही वर्षांपासून या भागातील नागरिकरणात वाढ झाली आहे. लोकसंख्या वाढत असून नागरी सुविधांची मागणी वाढली आहे. सद्यस्थितीत देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाला या सुविधा पुरेशा प्रमाणात देणे अशक्य आहे. त्यामुळे देहूरोडचे पिंपरी महापालिकेत विलिनीकरण अत्यंत आवश्यक आहे. पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचा पुणे महापालिकेत समावेश केला आहे. त्याचप्रमाणे देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश करावा. त्यामुळे देहूरोड मधील नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळतील. पाणी, कचरा, वीज, ऑनलाइन सेवा मिळतील. याचा नागरिकांना लाभ होईल. देहूरोड भौगोलिककदृशष्ट्या पिंपरी-चिंचवडच्या जवळ आहे. देहूरोड छावणी आर्थिक संकटांचा सामना करित आहे. केंद्र सरकारकडून अपेक्षित आर्थिक सहाय्य मिळत नाही. त्यामुळे नियोजित विकास होत नाही. नागरिकांना मुलभूत सुविधा मिळत नाहीत. देहूरोडमधील नागरिकांचीही महापालिकेत समावेश करण्याची मागणी आहे. त्यामुळे देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश करावा.