खासदार श्रीरंग बारणे यांचा विशेष पुरस्काराने गौरव

0
3

दिल्लीत झाला पुरस्कार वितरण सोहळा; लोकसभेत सातत्यपूर्ण कामगिरी

पिंपरी दि . २७ ( पीसीबी ) – लोकसभेतील सातत्यपूर्ण कामगिरीनिमित्त प्राईम पॉईंट फौंडेशनतर्फे मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना ‘संसदीय लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान’ पुरस्काराने गौरविण्यात आले. दिल्लीतील महाराष्ट्र सदनात हा कार्यक्रम झाला. दरम्यान, खासदार बारणे यांना यापूर्वी प्राईम पॉईंट फौंडेशनतर्फे पाच वेळा संसदरत्न, एकवेळा संसदमहासंसदरत्न, एकदा संसद विशिष्टरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना प्राईम पॉईंट फौंडेशनतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. फौंडेशनतर्फे दरवर्षी लोकसभा, राज्यसभेतील विशेष कामगिरी केलेल्या खासदारांना सन्मानित करण्यात येते. यंदा केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरण रिजूजी यांच्या हस्ते खासदार बारणे यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी ज्युरी कमिटीचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, प्राईम पॉईंट फौंडेशनचे अध्यक्ष के.श्रीनिवास, प्रियदर्शनी राव, जेष्ठ खासदार भर्तृहरी महताब उपस्थित होते.

केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरण रिजूजी म्हणाले, जगातील खासदारांच्या तुलनेत भारतातील खासदारांचे जीवन संघर्षमय आहे. सकाळी उठल्यापासून रात्री उशिरापर्यंत लोकांच्या कामे करावी लागतात. त्यांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागते. गटार तुंबणे, रस्त्यावरील खड्डे ते देशातील अशी विविध प्रकारची कामे करावी लागतात. त्यासाठी सतत कार्यरत राहून खासदारांना खूप कामे करावी लागतात. पुरस्कार मिळालेले खासदार संसदेतील प्रभावशाली आहेत. अनेक वर्षांचा त्यांचा संसदेतील दांडगा अनुभव आहे. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. प्राईम पॉईंट फौंडेशनतर्फे पुरस्कार मिळणारे खासदार भाग्यवान आहेत.

सभागृहात ९६ टक्के उपस्थिती

चालू १८ व्या लोकसभेत खासदार बारणे यांच्या कामगिरीतील सातत्य कायम आहे. खासदार बारणे यांची सभागृहात ९६ टक्के उपस्थिती आहे. त्यांनी १४८ प्रश्न विचारले आहेत. ३६ चर्चामध्ये सहभाग घेतला तर, एका वर्षाच्या कालावधीत ३ खासगी विधेयके मांडली आहेत. खासदार बारणे यांनी सर्वाधिक प्रश्न विचारले आहेत.

संसदेतील भाषणांबरोबच जमिनीवरही काम

खासदार बारणे यांनी केवळ संसदेत आवाज उठविला नाही. तर, प्रत्यक्षात जमिनीवर काम देखील केले आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मावळमधील आदिवासी पाडे, वाड्या वस्त्यांवर वीज, रस्त्यांची सुविधा निर्माण केली. गावा-गावांमधील अंतर्गत रस्ते, पाण्याची सुविधा सक्षम केली. स्व:खर्चाने पवना धरणातील गाळ काढून पिंपरी-चिंचवडकरांच्या पाण्याची सोय केली. पिंपरीत पासपोर्टचे कार्यालय सुरु केले. क्रांतिवीर चापेकर बंधुंच्या नावाने टपाल तिकीटाचे प्रकाशन केले. एच.ए. कंपनीला आर्थिक मदत मिळवून दिली. पवना, इंद्रायणी नदी सुधारच्या प्रकल्पाला गती दिली आहे. रेल्वेचे जाळे विस्तारले जात आहे. पनवेलला लोकल सुरु झाली. अमृत भारत रेल्वे स्टेशन योजने अंतर्गत समावेश रेल्वे स्थानकांचा कायापालट केला जात आहे. लोणावळा ते पुणे या दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकच्या कामाचा सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. संसदेतील भाषणांबरोबरच जमिनीवरही खासदार बारणे यांनी काम केले आहे.

जनतेसाठी अनेक आंदोलने, संघर्ष केला. नगरसेवक ते खासदार हा प्रवास संघर्षमय आहे. मावळच्या जनतेने सलग तीनवेळा लोकसभेत काम करण्याची संधी दिली. हा पुरस्कार मावळच्या जनतेला समर्पित करतो. माझ्या जडणघडणीत अनेक नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी साथ दिली. जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी लोकसभेत चांगले काम करीत आहे. त्यामुळे हा पुरस्कार मिळाला. लोकसभेसह स्थानिक पातळीवर जनतेची काम करण्यावर भर दिला आहे.
श्रीरंग बारणे
खासदार