खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नांना यश, पीएमआरडीएकडून मावळातील रस्त्यांसाठी 123 कोटींचा निधी

0
110

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या माध्यमातून आयटी नगरी हिंजवडी व तसेच मावळातील श्रीक्षेत्र देहू परिसरात एकूण तीन रस्त्यांच्या कामांसाठी सुमारे 123 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. पीएमआरडीएच्या माध्यमातून या रस्त्यांची कामे केली जाणार आहेत.

श्रीक्षेत्र देहू येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची ये-जा सुरू असते. देहूगाव ते येलवाडी ते तळेगाव-चाकण रस्ता या मार्गाची दुरवस्था झाल्याने या रस्त्याचे काम प्राधान्याने करण्याबाबत नागरिकांकडून खासदार बारणे यांना विनंती करण्यात आली होती. हिंजवडीमध्ये देखील रस्त्यांची दुरवस्था व वाहतूक कोंडीने वाहन चालक हैराण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर तेथील दोन रस्त्यांची कामे प्राधान्याने करण्याची सूचना खासदार बारणे यांनी केली. मेट्रोचे काम सुरू असलेल्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची सूचनाही बारणे यांनी केली.

खासदार श्रीरंग बारणे यांनी पीएमआरडीएच्या आयुक्तांसोबत बैठक घेतली. या बैठकीत पीएमआरडीएच्या माध्यमातून विविध रस्त्यांच्या कामाला निधी मिळाल्याचे सांगण्यात आले.

श्रीक्षेत्र देहूगाव ते येलवाडी ते तळेगाव मुख्य रस्त्याच्या कामासाठी 120 कोटी रुपये निधी मिळाला आहे. आयटी नगरी हिंजवडी मधील साखरे वस्ती रस्ता (ओलीव्ह सोसायटी) या कामासाठी 42 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. हिंजवडी फेज दोन मधील विप्रो सर्कल ते मारुंजी रस्त्यासाठी अडीच कोटी रुपये निधी मिळाला आहे.

वरील रस्त्यांपैकी हिंजवडी साखरे वस्ती ओलिव सोसायटी रस्ता पूर्ण झाला आहे. मारुंजी रस्त्याचे काम सुरू आहे. देहू येलवाडी रस्ता निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या रस्त्याचे काम लवकर सुरू होणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.