खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत पिंपरीतील समस्यांबाबत आज पाच वाजता बैठक

0
121

पिंपरी मर्चंट फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवाणी यांचा पुढाकार

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – वाहनतळ, वाहतूक कोंडी, अतिक्रमणे, पदपथ, रात्रीची गस्त आदी विषयांवर मार्ग काढण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत आज गुरुवारी (२९ऑगस्ट) दुपारी पाच वाजता विशेष बैठक आयोजित कऱण्यात आली आहे. पिंपरी मार्केटमधील हरदासराम मंडळी या ठिकाणी ही बैठक होणार असून सर्व व्यापारी बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पिंपरी मर्चंट फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवाणी यांनी केले आहे.


संघटनेच्या वतीने अध्यक्ष श्रीचंद आसवाणी यांनी खासदार बारणे यांना प्रत्यक्ष भेटून समस्यांचे एक सविस्तर निवेदन दिले. खासदार बारणे यांनी तत्काळ त्याची दखल घेतली आणि बैठकिचे आयोजन केले. पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्त, वाहतूक पोलिस सहआयुक्त,पोलिस मित्र संघटनेचे पदाधिकारी, वाहतूक संघटनेचे पदाधिकारी या सर्वांना बैठकिसाठी निमंत्रीत कऱण्यात आले आहे.


पिंपरी मार्केटमध्ये बेकायदा पार्किंगचा धंदा जोरात सुरू आहे. वाहतूक पोलिसांना त्याबाबत सुचना देण्याची गरज आहे. साई चौक येथे पदपथ कऱण्यात आल्याने वाहतुकिला अडथळा होता म्हणून तो पदपथ काढून टाकावा, अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे. रिव्हर रोड ला कायम वाहतूक कोंडी होते, तसेच बेकायदा पार्किंगमुळे रस्ता अक्षरशः बंद होत असतो त्यावर तोडगा काढण्याची नितांत गरज आहे. साई चौकात डिव्हायडर असल्याने वाहने जा-ये कऱण्यासाठी खूप त्रास होतो, तो डिव्हायडर काढण्याची गरज आहे. बाजारपेठेतील वीज सतत जाते, त्यावर तोडगा काढला पाहिजे. पिंपरी रेल्वे स्टेशन येथील अतिक्रमणामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे, तिथे कारवाईची गरज आहे. लाल मंदिराबाबत मोठा प्रश्न असल्याने त्याबाबत निर्णय घेण्याची गरज आहे. गेल्या दोन आठवड्यात चार-पाच वेळा दुकाने फोडण्यात आली. चोऱ्यांचे प्रमाणे प्रचंड वाढले आहे. त्यासाठी रात्री पोलीसांचे गस्त असली पाहिजे अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे.


संघटना अध्यक्ष म्हणून श्रीचंद आसवाणी यांच्या प्रमाणेच माजी उपमहापौर, माजी स्थायी समिती अध्यक्ष डब्बू आसवाणी, अनिल आसवाणी, हरेष आसवाणी, गोपी आसवाणी, राज आसवाणी यांनी या विषयांसाठी पाठपुरावा केला आहे.