खासदार श्रीरंग बारणे यांच्या निकालास आक्षेप घेणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल

0
89

मुंबई, दि. ८ऑगस्ट (पीसीबी) – मावळमधून शिंदे सेनेचे उमेदवार श्रीरंग चंदू बारणे यांचा विजय झाला. त्यांच्या निकालास आव्हान देण्यात आले आहे. त्यांच्या निकालाविरोधात पराभूत अपक्ष उमेदवार अ‍ॅड. राजू पाटील मुंबई उच्च न्यायालयात पोहचले आहे. त्यांनी याचिका दाखल केली आहे.

खासदार श्रीरंग बारणे यांच्या निकालास आक्षेप घेणारी याचिका अ‍ॅड. राजू पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्या याचिकेत त्यांनी निकालात आणि प्रचारादरम्यान अनेक गैरप्रकार झाल्याची तक्रार केली आहे. राजू पाटील यांनी म्हटले आहे की, मावळ लोकसभा मतदार संघात झालेले मतदान आणि मतमोजणीत आलेले मतदानात ५७३ मतांची तफावत आहे. इतकी तफावत येऊ नये. तसेच मतमोजणीच्या दिवशी अनेक अनोळखी लोक मतदान केंद्रात फिरत होते. त्यासंदर्भात आपण रितसर तक्रार दिली होती. परंतु त्याचीही दखल घेतली गेली नाही.

प्रचारात धार्मिक ध्रुवीकरणाचा आरोप
राजू पाटील यांनी खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रचारादरम्यान धार्मिक ध्रुवीकरण केल्याचा आरोप केला आहे. त्यासंदर्भात पुरावे आपण न्यायालयातील याचिकेत दिले असल्याचे म्हटले आहे. खासदार बारणे धार्मिक ध्रुवीकरण करुन जिंकून आले आहे. त्यासंदर्भात आपण आक्षेप घेतला आहे. त्यांनी धर्माच्या नावावर मते मागितली होती. त्याची तक्रार प्रशासन आणि पोलिसांकडे केली होती. परंतु त्याची दखल घेतली गेली नाही. १९८८ मध्ये असा प्रकार झाला होता. त्यावेळी त्या आमदाराची आमदारकी रद्द करण्यात आली होती. ही सर्व उदाहरण याचिकेत दिले आहेत. या याचिकेत अनेक गंभीर मुद्दे न्यायालयासमोर आणले आहे. त्यामुळे आपणास न्याय मिळेल, असा दावा राजू पाटील यांनी केला आहे.