खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते वडगाव शहरात दीड कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन

0
215

मावळ, दि. ३० (पीसीबी) – वडगावचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरालगत असलेल्या ऐतिहासिक तलावाचे केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत सुशोभीकरण केले जाणार आहेत. या कामासाठी तब्बल आठ कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात येणार असल्याचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी म्हटले.

वडगाव मावळ शहरात सुमारे दीड कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन गुरुवारी (दि. 28) करण्यात आले. खासदार श्रीरंग बारणे, पोटोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन झाले. यामध्ये कॉंक्रीट रस्ते, बंदिस्त जलनिःसारण वाहिन्या आणि इतर पायाभूत सुविधा पुरवल्या जाणार आहेत.

भूमिपूजन समारंभासाठी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अविनाश बवरे, भाजपचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, तालुका प्रभारी भास्करराव म्हाळसकर, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर भोसले, शिवसेनेचे तालुका प्रमुख राजेश खांडभोर, मनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर, मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम, माजी उपनगराध्यक्ष सायली म्हाळसकर, अर्चना म्हाळसकर, माजी नगरसेवक किरण म्हाळसकर, दिनेश ढोरे, दिलीप म्हाळसकर, नारायण ढोरे, प्रसाद पिंगळे, नितीन कुडे, संभाजी म्हाळसकर, भूषण मुथा, किरण भिलारे, मुन्ना मोरे, सुनीता भिलारे, दिपाली मोरे, विनायक भेगडे, महेंद्र म्हाळसकर, जगन्नाथ नाटक पाटील, सोमनाथ काळे आदी उपस्थित होते.

मावळ लोकसभा मतदार संघात येणाऱ्या गावांना सेवा देण्याच्या दृष्टीने खासदार श्रीरंग बारणे सातत्याने प्रयत्न करीत आहेत. वडगाव मावळ येथील दत्त मंदिराच्या कामात खासदार बारणे यांचा मोठा सहभाग आहे. राज्यात महायुतीचे सरकार आल्यापासून मावळ लोकसभा मतदारसंघातील राज्य शासनाच्या प्रयत्नातून सुरु असलेल्या कामांसाठी भरीव निधी मिळत आहे. तसेच केंद्राच्या अनेक योजना राबविण्याचे काम केले जात आहे.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला वेगळ्या उंचीवर नेण्याचे काम होत आहे. आपण सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून काम करत आहे. राजकीय जोडे बाजूला ठेऊन मावळ तालुक्याचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय आहे. त्यामुळे पुढील निवडणुकीत निवडून येण्याची चिंता नाही. पुढील काळात पोटोबा देवस्थान लगत असलेल्या ऐतिहासिक तलावाचे सुशोभीकरण अमृत योजनेंतर्गत केले जाणार आहे. त्यासाठी आठ कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे. केंद्राच्या मंजुरीनंतर या कामाला सुरुवात होईल.

केशवनगर येथील रेल्वेचा भुयारी मार्ग तांत्रिक अडचणींमुळे रद्द झाला आहे. तिथे आता उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. मावळ तालुक्यात राज्य शासन व स्थानिक खासदार निधीतून पीएमआरडीएच्या माध्यमातून सुमारे 15 कोटी रुपयांची विकासकामे सुचविण्यात आली असल्याचेही बारणे म्हणाले.