खासदार श्रीरंग बारणेंच्या तुलनेत प्रतिस्पर्धी संजोग वाघेरे गरिब, १८ कोटींची संपत्ती

0
204

शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या संपत्तीची माहिती दिली आहे. स्थावर आणि जंगम मालमत्ता मिळून १८ कोटी ४४ लाखांची मालमत्ता त्यांच्याकडे असल्याचे त्यांनी जाहीर केले. दरम्यान, त्यांच्या तुलनेत त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे तब्बल १३२ कोटींची संपत्ती हा आता मतदारसंघात चर्चेचा विषय झाला आहे.

महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजोग वाघेरे यांची १८ कोटी ४४ लाखांची मालमत्ता आहे. तर त्यांच्यावर २ कोटी ९८ लाख ३२ हजारांचे कर्ज आहे. संजोग वाघेरे यांच्या नावावर एकही वाहन नसल्याची नोंद आहे. वाघेरे यांच्याकडे ४ कोटी ४६ लाख ३६ हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तर त्यांच्या पत्नी उषा वाघेरे यांच्याकडे १ कोटी ८९ लाख ६३ हजार ११५ रुपयांची जंगम मालमत्ता आहे.

वाघेर यांच्याकडे किती रुपयांचे दागिने?
संजोग वाघेरे यांच्याकडे 6 कोटी 85 लाख रुपयांची स्थावर तर त्यांच्या पत्नीकडे 5 कोटी 20 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे, अशी एकूण त्यांच्याकडे 18 कोटी 44 लाख रुपयांची मालमत्ता असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. संजोग वाघेरे यांच्याकडे 351 ग्रॅम वजनाचे 21 लाख 76 हजार 571 रुपयांचे दागिने आहेत. त्यांच्याकडे एक लाख 54 हजार रुपयांची रोख रक्कम आहे. तर त्यांच्या पत्नीकडे पावणे दोन लाख रुपयांची रोख रक्कम आहे. या दोघांनी एका सहकारी बँकेमध्ये पाच लाख रुपयांची फिक्स डिपॉझिटमध्ये रक्कम ठेवलेली आहे.

दरम्यान, वाघेरे यांना 64 लाख 48 हजार 271 रुपयांचे देणे आहे. तर त्यांच्या पत्नी उषा वाघिरे यांना दोन कोटी 33 लाख 84 हजार रुपयांचे देणे आहे. संजोग वाघेरे यांच्याकडे 50 हजार 490 रुपयांचे विदेशी बनावटीचे पिस्तूल आहे. वाघेरे यांच्याकडे वाकड मध्ये एक तर पिंपरीमध्ये चार अशा पाच निवासी मालमत्ता आहेत. वाघेरे पती-पत्नींनी आपले उत्पन्नाचे साधन व्यवसाय दाखविले आहे.

संजोग वाघेरे यांनी जाहीर केल्याप्रमाणे त्यांच्याकडे स्वतःचे वाहन नाही. मात्र त्यांनी त्यांचे चिरंजीव ऋषिकेश वाघिरे यांना एक कोटी 24 लाख 99 हजार रुपयांचे कर्ज दिले आहे. तर त्यांच्या पत्नी उषा वाघेरे यांनी “शुभम उद्योग” या उद्योग समूहाला एक कोटी रुपयांचे कर्ज दिल्याचे नमूद करण्यात आले आहे. यांच्यासह अकरा जणांना संजोग वाघेरे यांनी कर्ज दिले आहे. प्रतिज्ञापत्रात नमूद केल्याप्रमाणे संजोग वाघेरे यांच्यावर तीन गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी पिंपरी पोलीस ठाण्यामध्ये दोन तर लोणावळा पोलीस ठाण्यामध्ये आंदोलना संदर्भात एक गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे.