खासदार महुआ मोईत्रा यांची खासदारकी होणार रद्द ? नैतिकता समितीने केला पाचशे पानांचा रिपोर्ट

0
278

नवी दिल्ली,दि.०९(पीसीबी) – संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात गिफ्ट घेतल्याप्रकरणात तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. संसदेच्या नैतिकता समितीने पाचशे पानांचा रिपोर्ट सादर केला असून त्यात मोईत्रा यांची खासदारची रद्द करावी अशी शिफारस करण्यात आली आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भातील बातमी दिली आहे.

नैतिकता समितीने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलंय की, महुत्रा मोईत्रा यांची कृती आक्षेपार्ह, अनैतिक, गुन्हेगारी स्वरुपाची आहे. त्यामुळे यामध्ये गंभीर शिक्षा होणे आवश्यक आहे. यासर्व प्रकरणी त्यांच्यावर निर्धारित वेळेत आणि कायदेशीर कारवाई करण्यात यावी. महुआ मोईत्रा यांनी आपला संसदेतील यूझर आयडी एका दुसऱ्या व्यक्तीला दिला. उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्याकडून रोख रक्कम आणि काही गिफ्ट घेतले. हे गंभीर वर्तन आहे. हिरानंदांनी आणि महुआ यांच्यामध्ये पैशांची झालेली देवाणघेवाण याची टाईम बाऊंड चौकशी करण्यात यावी, असं नैतिकता समितीने म्हटलं आहे.

दरम्यान नैतिकता समितीचा रिपोर्ट लोकसभा सभापती ओम प्रकाश बिर्ला यांच्यासमोर हिवाळी अधिवेशनामध्ये सादर करण्यात येईल. यावर चर्चा झाल्यानंतर कारवाईचा निर्णय घेण्यात येईल. गुरुवारी मोईत्रा नैतिकता समितीच्या समोर हजर होण्याची शक्यता आहे. यासर्व प्रकरणामुळे त्या अचडणीत आल्या आहेत. त्यांची खासदारची जाण्याची दाट शक्यता आहे.