खासदार बारणे यांना तीन लाखांहून अधिक मताधिक्य मिळालेच पाहिजे – दिनेश शर्मा

0
180

लोणावळा – निवडणूक देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. नरेंद्र मोदी यांना अभूतपूर्व मताधिक्याने पंतप्रधान करण्यासाठी प्रत्येक जागा महत्त्वाची आहे. त्यामुळे महायुतीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हेवे-दावे, मतभेद बाजूला ठेवून मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना तीन लाखांहून अधिक मताधिक्याने निवडून आणलेच पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र भाजपाचे प्रभारी डॉ. दिनेश शर्मा यांनी केले.

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराचा आढावा घेण्यासाठी दिनेश शर्मा यांनी लोणावळ्यातील चंद्रलोक हॉटेलमध्ये महायुतीच्या घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.‌

बैठकीस खासदार बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, अश्विनीताई जगताप, महेंद्र थोरवे, उमा खापरे, माजी आमदार सुरेश लाड, भाजपचे प्रदेश संघटक मकरंद देशपांडे, क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील, पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप, रायगड भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, उत्तर पुणे जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रामदास शेवाळे, बाळासाहेब वाल्हेकर, तसेच सदाशिव खाडे, अमित गोरखे, नामदेव ढाके, भाऊ गुंड, रवींद्र भेगडे, बापूसाहेब भेगडे, गणेश खांडगे, राजू खांडभोर, राजेंद्र तरस, शैलाताई पाचपुते, माऊली जगताप, राजेश वाबळे, बाबीर मेटकरी, निलेश तरस, विशाल हुलवळे, प्रवीण ढोरे, सुनील मोरे, चंद्रकांता सोनकांबळे, कुणाल वाव्हळकर, नवनाथ हारपुडे, भरत मानवल, भूषण जोशी, रवींद्र देशपांडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

दिनेश शर्मा म्हणाले की, पंतप्रधान मोदी आणि मतदार यांच्यातील दुवा म्हणून महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी काम करायचे आहे. आपल्या घरचे कार्य असल्याप्रमाणे कोणीही दुखावले जाणार नाही याची काळजी घेत जास्तीत जास्त मतदान होईल याची काळजी घेतली पाहिजे. खासदार बारणे यांना मत म्हणजे पंतप्रधान मोदींना मत, हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे.

खासदार बारणे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थितीची माहिती दिनेश वर्मा यांना दिली. मागील दोन्ही निवडणुकांमध्ये भाजप व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोलाची कामगिरी बजावल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. या निवडणुकीतही सर्वांचे चांगले सहकार्य मिळत असून विक्रमी मताधिक्याने याही वेळी आपण निवडून येऊ, असा विश्वास बारणे यांनी व्यक्त केला.