खासदार पटेल, तटकरे बडतर्फ, शरद पवार यांचे ट्वीट

0
303

मुंबई, दि. ३ (पीसीबी) : राज्याच्या राजकारणात रविवारी( दि.२) मोठा राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादीत बंडखोरी उफाळून आली असून अजित पवारांसह नऊ आमदारांनी थेट शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील होत मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आता राष्ट्रवादीकडून बंडखोरांवर कारवाई करण्याबाबत आक्रमक पावले उचलण्यात सुरु आहे. शपथविधीला उपस्थित आलेल्या दोन खासदारांना पक्षातून बडतर्फ केल्याची माहिती शरद पवार यांनी ट्विट करत दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा च्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंवर कारवाईचा प्रस्ताव शरद पवारांकडे पाठवला होता. यावेळी सुळे यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी 2 जुलै 2023 रोजी पक्षाची घटना आणि नियमांचे थेट उल्लंघन केले आहे. यामुळे त्यांना बडतर्फ करून अपात्र करावे अशी मागणी सुळे यांनी केली आहे.

आता राष्ट्रवादीने अजित पवारांच्या शपथसोहळ्याला उपस्थित असलेल्या पदाधिकारी, नेत्यांवर बडतर्फीची कारवाई सुरु केली आहे. याच धर्तीवर आता खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांच्यावर बडतर्फतेची कारवाई केली आहे.

सुळे यांची मागणी काय..?
सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांना पाठवलेल्या पत्रात भारतीय राज्यघटनेच्या 10 व्या अनुसूची अंतर्गत अपात्रतेची याचिका सक्षम प्राधिकार्‍यासमोर दाखल करावी असा प्रस्ताव शरद पवारांकडे पाठवला होता.
कोल्हेंना कारवाईतून वगळले…

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे हे देखील अजित पवारांसह नऊ आमदारांच्या शपथविधीला उपस्थित होते. त्यापूर्वी ते अजित पवारांच्या बंगल्यावर देखील होते. आपण वेगळ्या कामासाठी गेलेलो, तेव्हा आपल्याला कल्पना नव्हती, असा खुलासा कोल्हे यांनी केला आहे. तसेच तेव्हा आपण सुप्रिया सुळे यांना देखील भेटल्याचे कोल्हे यांनी म्हटले आहे. आज त्यांनी अजित पवारांचा निर्णय आपल्याला पटला नसल्याचा खुलासा केला आहे. यामुळेच मी माझी भूमिका आज मांडली आहे असे कोल्हे म्हणाले आहेत.