पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – शिरुर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे हेच असणार आहेत, अशी घोषणा राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांची मेळाव्यात गुरुवारी (ता. ८) मोशी येथे केली.
लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने भोसरी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांचा विजय संकल्प दिवस मेळावा मोशी येथे आयोजित केला होता. यावेळी जयंत पाटील यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. यावेळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना खासदार कोल्हे हेच उमेदवार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या वेळी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, नेते प्रकाश म्हस्के, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, विकास लवांडे, शहराध्यक्ष तुषार कामठे, माजी नगरसेविका सुलक्षणा धर-शिलवंत, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, महिला शहराध्यक्ष ज्योती निंबाळकर, प्रवक्ते माधव पाटील आदी उपस्थित होते.
जयंत पाटील यांनी भोसरी विधानसभा विभागातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. शिरुर लोकसभेत पुन्हा एकदा आपल्याला कोल्हे यांना खासदार म्हणून दिल्लीत पाठवायचे आहे. त्यासाठी भोसरी विधानसभेत सर्वांनी एकजुटीने काम करावे. ताकदीनिशी काम करून पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश त्यांनी दिले.
बुथ समित्या सक्षम करण्यावर सर्वांनी भर देण्याचे आवाहन त्यांनी पदाधिकाऱ्यांना केले. यावेळी इम्रान शेख यांनी ४६४ बुथ समित्यांची बांधणी करण्याची जबाबदारी घेण्याबाबत सुतोवाच केले. त्यावर जयंत पाटील यांनी शडराध्यक्ष कामठे व इम्रान शेख यांना महिला, युवक सर्वांना बरोबर घेऊन येत्या १५ दिवसात बुथ समित्या बांधण्याची सूचना केली. भोसरी विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष ज्ञानेश्वर आल्हाट यांनी प्रास्तविक केले. माणिक जैद पाटील यांनी सूत्रसंचलन केले व अरुण थोपटे यांनी आभार मानले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाच्या बाबतीत जो निर्णय व्हायचा तो झालेला आहे. परंतु; निवडणूक आयोगाने आपल्याला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार’ हे नाव दिले आहे. आता नावाला देखील काही जणांनी विरोध सुरू केला आहे. कारण, आता शरदचंद्र पवार हे नाव पक्षासोबत असल्यामुळे सर्वांना खरा आणि शरद पवार यांच्या विचारांचा पक्ष कोणता, हे सर्वांना समजणार आहे. त्याचीच भीती त्या सर्वाना आहे, असेही यावेळी जयंत पाटील म्हटल्याचे पदाधिकाऱ्यांना सांगितले.