खासदार गिरीश बापट यांचे निधन

0
360

पुणे, दि. २९ (पीसीबी) : राज्यातील भाजपच्या जुन्या जाणत्या नेत्यांपैकी एक असलेल्या गिरीश बापट( वय-७०) यांचे प्रदीर्घ आजाराने आज दिनानाथ मंगशेकर स्मृती रूग्णालयात निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, सून असा परिवार आहे.

आपल्या तब्बल चार दशकांच्या राजकीय कारकीर्दीत गिरीश बापट यांनी संघ स्वयंसेवक, कामगार नेता, नगरसेवक, आमदार आणि खासदार अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. पुण्यातील स्थानिक राजकारणात गिरीश बापट यांचा मोठा दबदबा होता.

गिरीश बापट हे मूळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. जनसंघापासून ते राजकारणात उतरले. नगरसेवक पदापासून सुरुवात केलेले गिरीश बापट १९९५ पासून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रसेच्या मोहन जोशी यांचा पराभव करत त्यांनी लोकसभा गाठली होती.

कोण आहेत गिरीश बापट ?
गिरीश बापट यांचा जन्म 3 सप्टेंबर 1950 रोजी पुण्यात झाला. तळेगाव दाभाडेमधून प्राथमिक शिक्षण झाल्यावर त्यांचे माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल रमणबागेत झाले. बीएमसीसीत वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यावर बापट 1973 मध्ये टेल्कोमध्ये कामगार म्हणून रुजू झाले. त्यानंतर दोन वर्षांतच आणीबाणीमध्ये 19 महिन्यांचा कारावास नाशिक जेलमध्ये त्यांनी भोगला.

कामगार नेता
पुण्याच्या राजकारणात ‘भाऊ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरीश बापट यांनी तरुणपणी टेल्को कंपनीत काम केले. यावेळी त्यांनी कामगारांच्या मागण्यांसाठी अनेकदा लढा दिला होता.

गिरीश बापट यांचा राजकीय प्रवास
आणीबाणीच्या काळात तुरुंगात शिक्षा भोगून आल्यानंतर गिरीश बापट यांच्या राजकीय कारकीर्दीला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ आणि परिवारातील संस्थांतील विविध पदांची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पेलली. १९८३ मध्ये पहिल्याच प्रयत्नात ते पुणे महानगरपालिकेत नगरसेवक झाले. सलग तीन टर्म त्यांनी नगरसेवकपद राखले. याचा काळात आपल्या सर्वपक्षीय जनसंपर्काच्या जोरावर गिरीश बापट महापालिकेत पक्षाची सत्ता नसतानाही स्थायी समितीचे अध्यक्ष झाले होते.

1995 मध्ये आमदारकीची निवडणूक लढविली अन्‌ पुढे सलग 2014 पर्यंत ते पाच वेळा निवडून आले. 1996 साली त्यांना भाजपाने पुण्यातून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली होती. पण बापट यांचा पराभव झाला आणि काँग्रेसचे सुरेश कलमाडी खासदार झाले. 2014 मध्ये गिरीश बापट यांना लोकसभा निवडणूक लढवायची होती. मात्र, पक्षाने अनिल शिरोळे यांना उमेदवारी दिल्यामुळे त्यांची संधी हुकली. परंतु, 2019 मध्ये योग्यपणे मोर्चेबांधणी करत त्यांनी खासदारकीचे तिकीट मिळवले. त्यानंतर निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या मोहन जोशी यांचा तब्बल 96 हजार मतांनी पराभव केला.

दांडगा जनसंपर्क आणि सर्वपक्षीय कनेक्शन

गिरीश बापट हे पुण्याच्या राजकारणात ‘सर्वसमावेशक’ राजकारणासाठी ओळखले जातात. विरोधी पक्षाची सत्ता असली तरी आपले काम साधून घेण्याचे कसब गिरीश बापट यांना उत्तम अवगत आहे. दांडगा लोकसंपर्क हे गिरीश बापट यांची जमेची बाजू मानली जाते. सगळयांशी मिसळून राहण्याच्या वृत्तीमुळे गिरीश बापट यांचा राजकीय प्रवास नेहमीच सुकर झाला.
वादग्रस्त वक्तव्यांमुळे गोत्यात

कार्यकर्त्यांमध्ये रमतानाच कट्ट्यावर बसून गप्पांचा फड रंगविण्याची हातोटी असल्यामुळे कोठे काय घडत आहे, याची बित्तंबातमी त्यांच्यापर्यंत पोचते. काहीवेळा उत्साहाच्या भरात त्यांनी केलेली वक्तव्ये वादग्रस्त ठरली. तरुणाईला संबोधताना ‘हिरवा देठ‘ हे त्यांचे वक्तव्य सुद्धा चांगलेच गाजले होते.

‘चल म्हटली की लगेच चालली’ असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी पुण्यातील एका शाळेत झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या उपस्थितीत केले होते. बापट म्हणाले, “स्वामी विवेकानंद जेव्हा परदेशात गेले होते तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे, भाषणामुळे एक युवती प्रभावित झाली . ती सतत त्यांच्या मागे-पुढे करत होती. अखेर ती विवेकानंदांना भेटली आणि लग्न करायचे आहे अशी इच्छा व्यक्त केली. आपण लग्न केले तर मला तुझ्यासारखा तेजस्वी मुलगा होईल असेही ती युवती स्वामी विवेकानंदांना म्हणाली. हे सगळे सांगत असतानाच गिरीश बापट दोन क्षण थांबले आणि म्हणाले की तो काळ आत्तासारखा नव्हता, चल म्हटले की चालली!”