खासदार अमोल कोल्हे यांचे सर्वात मोठे काम, २० हजार कोटींच्या तीन मार्गाच्या निविदा

0
408

नारायणगाव, दि. २७ (पीसीबी) : मागील अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीच्या समस्येने ग्रासलेल्या नाशिक फाटा ते चांडोली, तळेगाव, चाकण, शिक्रापूर आणि पुणे – शिरूर या तीनही राष्ट्रीय महामार्गाच्या १९ हजार १९२ कोटी रुपयांच्या विकास कामाच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या विकास कामा संदर्भात मी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून या माध्यमातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जनतेला नवीन वर्षाची भेट दिली आहे. अशी भावना खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली.

खासदार डॉ. कोल्हे म्हणाले सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय महामार्गाची कामे मार्गी लावण्याचा मी मायबाप जनतेला शब्द दिला होता. आज नाशिक फाटा ते चांडोली, तळेगाव, चाकण, शिक्रापूर आणि पुणे – शिरूर या तीनही राष्ट्रीय महामार्गाच्या कामांची निविदा प्रक्रिया सुरू झाल्याने शब्दपूर्तीच्या दिशेने पाऊल पडत आहे याचा मला विशेष आनंद वाटतो. मी सातत्याने या तीनही महामार्गांच्या कामांचा पाठपुरावा करीत होतो. मात्र मंजुरी मिळाल्या नंतर ही कामे मार्गी न लागता निविदा प्रक्रिया रद्द झाल्याने ही कामे होणार की नाही अशी शंका नागरिकांच्या मनात निर्माण झाली होती. परंतु केवळ रस्ता होणे महत्त्वाचे नव्हते तर, पुढील ३०-३५ वर्षांचा विचार करुन नियोजन करण्याची गरज होती. त्यामुळे नाशिक फाटा ते चांडोली, तळेगाव, चाकण, शिक्रापूर आणि पुणे – शिरूर या तीनही महामार्गांवर एलिव्हेटेड कॉरिडॉर बांधण्यासाठी प्रयत्नशील होतो.

खासदार डॉ. कोल्हे पुढे म्हणाले, माझ्या प्रयत्नांना केंद्रीयमंत्री गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत अतिशय तातडीने या तीनही प्रकल्पांचे डीपीआर तयार करण्याचे निर्देश दिले होते.भविष्यात पुन्हा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये यासाठी मी डीपीआर बनविण्याच्या प्रत्येक टप्प्यावर सातत्याने लक्ष ठेवून सूचना करीत होतो. डीपीआर तयार झाल्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. मात्र मंजुरीसाठी लागत असलेला विलंब लक्षात घेऊन नुकत्याच पार पडलेल्या संसद अधिवेशन काळात केंद्रीयमंत्री गडकरी यांची मी भेट घेतली होती. केंद्रीयमंत्री गडकरी यांनी विकासाच्या कामात कोणतेही राजकारण येऊ देणार नाही. असे आश्वस्त करीत महिनाभरात कामाचा शुभारंभ करु असा शब्द मला दिला होता. त्यानुसार त्यांनी तीनही राष्ट्रीय महामार्गाच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात करण्याचे आदेश दिले आहेत. ७ फेब्रुवारी २०२४ निविदा भरण्याची अंतिम तारीख आहे. त्यानंतर महिनाभरात तांत्रिक बाबींच्या पूर्तता होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. ही कामे पूर्ण झाल्यानंतर अनेक वर्षाच्या वाहतूक कोंडीच्या दुष्टचक्रातून नागरिकांची सुटका होईल. मात्र काम पूर्ण होईपर्यंत माझा पाठपुरावा सुरूच राहणार आहे.