दि. ११ (पीसीबी) : खासगी क्षेत्रातील बँक असलेल्या आयसीआयसीआय बँकेने १ ऑगस्ट २०२५ पासून बचत खात्यांसाठी मासिक सरासरी शिल्लक रकमेची आवश्यकता झपाट्याने वाढवली आहे. सुधारित नियमांनुसार आता महानगर आणि शहरी भागातील ज्या शाखा आहेत, तिथल्या खातेधारकांना मासिक सरासरी शिल्लक रक्कम ५०,००० रुपये (पूर्वी १०,०००) एवढी ठेवावी लागेल. बँकेच्या या निर्णयानंतर आता सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. जनतेच्या पैशांची ही लूट असल्याचे अनेकजण बोलत आहेत.
फक्त महानगर किंवा मोठी शहरेच नाही तर इतर भागांसाठीही हे बदल करण्यात आले आहेत. निमशहरी भागासाठी किमान शिल्लक २५,००० रुपये (पूर्वी ५०००) आणि ग्रामीण भागातील खातेधारकांसाठी ही रक्कम १०,००० (पूर्वी २,५००) रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. १ ऑगस्ट २०२५ नंतर खाते उघडलेल्या खातेधारकांनाच हे नवे नियम लागू होणार आहेत. जुन्या ग्राहकांना नवे निकष लागू होणार नाहीत. नवे खातेधारक जर किमान सरासरी रक्कम खात्यात ठेवू शकले नाहीत तर त्यांच्याकडून दंडही आकारण्यात येणार आहे. आवश्यक किमान मासिक सरासरी शिल्लक राखण्यात अयशस्वी होणाऱ्या ग्राहकांना कमी रकमेच्या ६ टक्के किंवा ५००, यापैकी जे कमी असेल ते आकारले जाईल. या नव्या नियमांमुळे आता आयसीआयसीआय बँक सर्वात महागड्या खासगी बँकांपैकी एक झाली आहे. दुसरीकडे सार्वजनिक क्षेत्रातील अनेक बँकांनी किमान शिल्लक रकमेचा दंड रद्द केला आहे. दुसरीकडे एचडीएफसी आणि ॲक्सिस बँकेत शहरी भागातील ग्राहकांसाठी खात्यात किमान शिल्लक रक्कम १०,००० रुपये ठेवण्याचा नियम आहे.