निगडी, दि. २० (पीसीबी) – खासगी फायनान्स कंपनीकडून पैसे घेतले. त्यातील काही रक्कम परत केली. उर्वरित रक्कम न देता पैसे मागितल्यास विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत दोघांनी व्यावसायिकाची फसवणूक केली. हा प्रकार २८ जुलै २०२० ते १९ डिसेंबर २०२२ या कालावधीत प्राधिकरण निगडी येथे घडली.
प्रशांत हिम्मतराव देशमुख (वय ५४, रा. पूर्णानगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बासू निर्मल अधिकारी (वय ३९), महिला (वय ३२, दोघे रा. खराळवाडी, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा खासगी फायनान्सचा व्यवसाय आहे. आरोपींनी फिर्यादीकडून १८ सप्टेंबर २०२० रोजी ३० लाख रुपये कर्ज घेतले. त्यापैकी २२ लाख रुपये मुद्दल आणि त्यावरील मासिक व्याज ३३ हजार रुपये असे २८ जुलै २०२२ पासून फिर्यादीस देणे बंद केले. त्यामुळे फिर्यादींनी आरोपींकडे पैशांची मागणी केली. त्यावर आरोपींनी फिर्यादीस विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत घेतलेले पैसे परत न देता आर्थिक फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.











































