खासगी गाडीवर आमदाराचा लोगो लावून मिरवणाऱ्यावर गुन्हा.

0
9

खासगी गाडीवर आमदाराचा लोगो लावून मिरवणाऱ्यावर गुन्हा खासगी वाहनावर आमदाराचा लोगो लावून भारतीय राज चिन्हाचा गैरवापर केल्याप्रकरणी मानव व्यकंटेश मुन्नास्वामी या तोतया आमदाराविरोधात कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. वडाळा टी टी पोलिसांनी या तोतया आमदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत त्याची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार असून त्याला चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजाविण्यात आली आहे. यातील तक्रारदार वडाळा येथे राहत असून एका सामाजिक संस्थेत अध्यक्ष म्हणून काम करतात. याच संस्थेत पूर्वी मानव हा उपाध्याक्ष म्हणून काम पाहत होता, अशी माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, ज्या व्यक्तीने तोतया आमदाराविरोधात तक्रार केली आहे, त्यांची एक सामाजिक संस्था आहे. याच संस्थेमध्ये हा तोतया उपाध्याक्ष म्हणून काम पाहत होता. मात्र सध्या त्याचा त्यांच्या संस्थेशी कुठलाही संबंध नाही. मानव हा वडाळा येथे राहत असून तो अनेकांना आमदार असल्याचे सांगत होता. राज्य शासनाच्या तो कोणत्याही पदावर नाही. तसेच तो निवडून आलेले लोकप्रतिनिधी नसून महाराष्ट्र विधान मंडळाच्या विधानसभा किंवा विधानपरिषद या दोन्ही सभागृहापैकी कोणत्याही सभागृहाचा सभासद नाही. तरीही स्वतःच्या दोन्ही खासगी वाहनांवर आमदार असल्याचा लोगो लावत होता. हा प्रकार अलीकडेच तक्रारदाराच्या निदर्शनास आला होता. त्यामुळे त्यांनी त्याच्या दोन्ही कारचे फोटो काढले होते.

मानव मुन्नास्वामी हा स्वतःला आमदार सांगून शासकीय सवलतीचा मोठ्या प्रमाणात गैरवापर करत होता. टोलनाक्यावर टोल चुकविण्यासाठी आमदार असल्याचे सांगत होता. हा प्रकार लक्षात येताच तक्रारदारांनी हा प्रकार तिथे उपस्थित पोलिसांना सांगून मानव मुन्नास्वामीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत त्याची शहानिशा सुरू केली होती. ज्यानंतर या तक्रारीत तथ्य असल्याचे उघडकीस आले. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी भारताच्या राज्य चिन्हाचा गैरवापर करणे आणि भारतीय न्याय सहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांकडून चौकशीसाठी हजर राहण्याचे नोटीस बजाविण्यात आली आहे. याच गुन्ह्यांची त्याची पोलिसांकडून चौकशी करून जबानी नोंदविण्यात येणार आहे.