खालुम्ब्रे गावात टोळक्याकडून पाच जणांवर जीवघेणा हल्ला

0
693

चाकण, दि. १३ (पीसीबी) – एका टोळक्याने लाकडी दांडा, रॉड, तलवार, पिस्टल अशी शस्त्रे घेऊन हॉटेलमध्ये घुसून पाच जणांवर जीवघेणा हल्ला केला. एका महिलेचा विनयभंग करून हॉटेल चालकावर पिस्टल रोखून पैशांची मागणी केली. ही घटना शनिवारी (दि. 11) रात्री सव्वानऊ वाजता खेड तालुक्यातील खालुम्ब्रे गावात घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

निखील नंदू बोत्रे (वय 28, रा. खालुम्ब्रे, ता. खेड), प्रशांत धर्मा लांडगे ( 23), तेजस संजय डीक्कर (वय 21, रा. खराबवाडी, ता. खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अटक केलेल्या आरोपींसह आशुतोष रॉय आणि अन्य पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 19 वर्षीय तरुणाने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणाचे खालुम्ब्रे गावात हॉटेल आहे. आरोपी शनिवारी रात्री सव्वानऊ वाजताच्या सुमारास लाकडी दांडा, लोखंडी रॉड, तलवार आणि पिस्टल अशी घातक हत्यारे घेऊन फिर्यादीच्या हॉटेलमध्ये आले. आरोपींनी हॉटेलमध्ये तोडफोड करून दहशत निर्माण केली. फिर्यादी यांच्या वडिलांच्या डोक्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. फिर्यादीच्या आईवर वार करून तिच्याशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. हॉटेलमधील कामगार, फिर्यादी यांचा मित्र आणि फिर्यादी यांना देखील मारहाण करून जखमी केले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीवर पिस्तुल रोखले आणि ‘आता तू मला पाच हजार एवजी दहा हजार रुपये दे. नाहीतर तुझे हॉटेल बंद कर. तसेच तुमच्यापैकी एकालाही जिवंत ठेवणार नाही’ अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.