महाळुंगे, दि. ६ – पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून एकाचा खून करण्यात आला. ही घटना 1 जुलै रोजी सायंकाळी खेड तालुक्यातील खालुंब्रे गावाच्या हद्दीत घडली. याप्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. खून केल्यानंतर आरोपी मावळ तालुक्यातील जांबवडे गावात लपून बसले होते.
मयूर अशोक पवार (वय 30, रा. तळेगाव दाभाडे), विशाल पांडुरंग तुळवे (वय 37), रणजीत बाळू ओव्हाळ (वय 22), प्रथम सुरेश दिवे (वय 21), विकास पांडुरंग तुळवे (वय 35), सनी रामदास तुळवे (वय 26), चंद्रकांत भीमराव तुळवे (वय 38, सर्व रा. खालुंब्रे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. गणेश अनिल तुळवे (वय 30, रा. खालुंब्रे, ता. खेड, जि. पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत त्यांचा भाचा प्रणय प्रदिप ओव्हाळ (वय 21, रा. कान्हे फाटा, वडगाव, ता. मावळ, जि. पुणे) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी प्रणय आणि त्यांचा मामा गणेश हे सोमवारी सांयकाळी सात वाजताच्या सुमारास दुचाकीवरून चालले होते. ते तळेगाव चाकण रस्त्यावरील खालुंब्रे गावच्या हद्दीत हैद्राबादी बिर्याणी हाऊससमोर आले असता दोन आरोपी दुचाकीवरून आले. त्यांनी गणेश यांच्यावर कोयत्याने वार केले. फियादी प्रणय हे सोडविण्यासाठी आले असता आरोपींनी त्यांच्यावरही वार केले. यामध्ये गणेश यांचा मृत्यू झाला.
आरोपींच्या तावडीतून मामाला सोडविण्यासाठी फिर्यादी प्रणय गेले असता आरोपींनी त्यांच्यावरही कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यात प्रणय हे गंभीर जखमी झाले आहेत. खून झाल्यानंतर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी 48 तासात आरोपींचा शोध घेऊन सात जणांना अटक केली. खून केल्यानंतर आरोपी मावळ तालुक्यात लपून बसले होते. त्यांचा ठावठिकाणा शोधून जांबवडे गावातून त्यांना अटक करण्यात आली.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते, सहायक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे, पोलीस अंमलदार तानाजी गाडे, विठ्ठल वडेकर, किशोर सांगळे, संतोष काळे, गणेश गायकवाड, शिवाजी लोखंडे, अमोल बोराटे, संतोष वायकर, राजेंद्र खेडकर यांनी केली.