खारघर मधील दुर्घटना प्रकऱणात आप्पासाहेब धर्माधिकारींना अटक करा – डॉ.श्रीमंत कोकाटे

0
275

सोलापूर, दि. २१ (पीसीबी) : आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार खारघरमध्ये प्रदान करत असताना उष्माघाताचा त्रास होऊन 14 साधकांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. त्यानंतर राज्यात सत्ताधारी विरूद्ध विरोधकांनी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत त्या गोष्टीवरून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावरूनच इतिहासकार श्रीमंत कोकाटे यांनी सत्ताधाऱ्यांसह ज्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला त्यांनाही धारेवर धरले आहे. डॉ. श्रीमंत कोकाटे हे एवढ्यावरच न थांबता त्यांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यामुळेच 14 लोकांचा जीव गेला असून, त्यांच्या मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी खारघरमधील घटना दुर्देवी घटना घडल्यानंतर मृतांविषयी संवेदना व्यक्त करून त्यांनी श्रीसेवकांच्या मृत्युस आप्पासाहेब धर्माधिकारी हेच जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या कार्यक्रमामध्ये निष्पाप लोकांचा मृत्यू झाल्याने -आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करुन अटक करावी अशी मागणीही श्रीमंत कोकाटे यांनी केली आहे.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रम हा धर्माधिकारी यांच्या अट्टाहासामुळे कार्यक्रम दुपारी घेण्यात आला. त्यांच्या या हट्टाहासामुळेच साधकांच्या हत्याही झाल्या असल्याचा गंभीर आरोप करत सांधकाचे झालेले मृत्यू हे नैसर्गिक नसून हत्या झाल्या आहेत असा गंभीर आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे. महाराष्ट्र सरकारला जर मृत्यू झालेल्या श्रीसेवकांविषयी आपुलकी असेल तर पोलीस खात्याने धर्माधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

छत्रपती शिवाजी महाराज,फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राच्या काँग्रेस-राष्ट्रवादी-भाजप, शिवसेना या पक्षांनी रामदासी संप्रदायाचे विचार लादण्याचे काम केले आहे. त्यामुळे आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण देऊन शिवसेना भाजप सरकारने महाराष्ट्राचा व थोर महापुरुषांचा घोर अपमान केला आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

43 अंश सेल्सिअस तापमान असतानादेखील श्री सेवकांना 7 तास पाणीदेखील दिले गेले नाही. तर पुरस्कार वितरण करणारे मात्र राज्यकर्ते एकाच मंचावर एसीमध्ये उपस्थित होते असा टोला त्यांनी आयोजकांना लगावला आहे.