नवी मुंबई, दि. २१ (पीसीबी): नवी मुंबईतील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या आकडा १४ वर असताना, शिवसेना नेते संजय राऊत यांनी गुरुवारी याबाबत एक धक्कादायक दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार या दुर्घटनेत केवळ १४च नव्हे, तर ५० ते ७५ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि महाराष्ट्र सरकार मृतांची खरी संख्या लपवत आहे.
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, त्यांनी रायगड जिल्ह्यातील उरण, श्रीवर्धन, रोहा आणि माणगाव तालुक्यातील त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ज्यांनी त्यांना सांगितले की, खारघरमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या लोकांची संख्या सरकारने जाहीर केलेल्या संख्येपेक्षा जास्त आहे.
खारघर परिसरात रविवारी झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उन्हाचा तडाखा बसल्याने १४ जणांचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हा कार्यक्रम एका मोकळ्या मैदानात आयोजित करण्यात आला होता आणि या कार्यक्रमाला लाखो लोक उपस्थित होते. त्यापैकी बहुतेक समाजसेवक अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे अनुयायी होते, ज्यांना या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राज्य सरकार मृतांचा खरा आकडा लपवत असल्याचा आरोप करून राऊत म्हणाले, सर्व गावांतील (रायगडमधील तालुक्यांमधून) एकूण आकडेवारी पाहिली तर किमान ५० आणि जास्तीत जास्त ७५ लोकांचा मृत्यू झाला आहे. ‘खोके सरकारने’ (उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारची खिल्ली उडवण्यासाठी वापरणारा शब्द) लोकांच्या घरोघरी पोहोचून मृतांच्या कुटुंबीयांचा आवाज दाबला आहे. तसेच “हे क्रूर सरकार आहे आणि त्याला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. सरकारने तात्काळ राजीनामा द्यावा,” असा आरोप त्यांनो केला.