खारघर दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करा – अजित पवार

0
160

पुणे, दि. २१ (पीसीबी) : महाराष्ट्रभूषण पुरस्कार वितरण समारंभप्रसंगी खारघर येथे झालेल्या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करावी, या मागणीसाठी राज्यपाल रमेश बैस यांना पत्र दिले आहे. शिवाय या समारंभासाठी खूप मोठा खर्च झाला आहे.

खर्चाचा नेमका आकडा समजण्यासाठी या समारंभाच्या खर्चाबाबतची माहिती माहितीच्या अधिकारात मागविली असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शुक्रवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (पीडीसीसी) वर्षभरातील कामाच्या प्रगतीची माहिती देण्यासाठी अजित पवार यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

पवार म्हणाले, ‘‘या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांची राज्य सरकारने जाहीर केलेली आकडेवारी आणि प्रत्यक्षात झालेल्या मृत्यूच्या संख्येत मोठी तफावत येत असल्याचे, या दुर्घटनेबाबत बाहेर येत असलेल्या विविध क्लिप्स माध्यमातून स्पष्ट होत आहे. हा सरकारी कार्यक्रम होता. त्यामुळे यासाठी उपस्थित राहणाऱ्यांची काळजी घेण्याचे सरकारचे काम आणि जबाबदारी होती. प्रत्यक्षात तसे काहीच झालेले नाही. आतापर्यंत देण्यात आलेल्या सर्व महाराष्ट्रभूषण पुरस्कार समारंभासाठी झालेल्या प्रत्येकी एकूण खर्चापेक्षा या कार्यक्रमाला झालेला खर्च कितीतरी जास्त आहे.

मग एवढा मोठा खर्च करूनही उपस्थित श्री सदस्यांसाठी मंडप का टाकला नव्हता. त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची सोय का केली नव्हती. हे श्री सदस्य किमान सात तासांहून अधिक काळ उपाशी-तापाशी असल्याचे पोस्टमार्टेम अहवालातून उघड झाले आहे. याच कार्यक्रमात एका बाजूला चांदीच्या ताटात शाही जेवण करणारी मंडळी आणि दुसऱ्या बाजूला पिण्यासाठी पाणीही न दिलेली मंडळी दिसत आहे. हा विरोधाभास कशासाठी?.’’