-माजी सत्तारुढ पक्षनेता नामदेव ढाके यांच्या पाठपुराव्याला यश
पिंपरी, दि. १० (पीसीबी) : रेल्वे प्रशासनाने पुणे– अमरावती- पुणे दरम्यान विशेष रेल्वे सूरू करण्याचा निर्णय घेतला असून गाडी क्र.०११०१ पुणे–अमरावती विशेष रेल्वे १० नोव्हेंबर २०२३ ते १० फेब्रुवारी २०२४ या दरम्यान दररोज पुणे – अमरावती- पुणे असा प्रवास सूरू करणार आहे. रेल्वे मंत्रालयाने घेतलेल्या या निर्णयामुळे खान्देश सह विदर्भातील पुणे येथे नोकरीनिमीत्त स्थायिक झालेल्या नागरिकांना याचा फायदा होणार आहे. माजी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून सरकारकडून खान्देश व विदर्भवासियांसाठी हे खास दिवाळी गिफट असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेबजी दानवे पाटील यांच्याकडे दि. ५ डिसेंबर २०२३ रोजी श्री. नामदेव ढाके यांनी पत्राद्वारे पुणे (लोणावळा किंवा चिंचवड) ते भुसावळ स्वतंत्र रेल्वेसेवा सुरु करण्याची मागणी करून पाठपुरावा सूरु केला होता. त्यांच्या या मागणीला यश आले असून दररोज हजारो प्रवाशांना याचा लाभ होणार आहे. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. आज दि. १० नोव्हेंबर २०२३ पासून पुणे येथून ११.०५ वाजता विशेष रेल्वे सुटणार आहे. तसेच, दुस-या दिवशी ००.५५ वाजता अमरावती येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासाला ही गाडी अमरावती स्टेशन येथून दररोज २२.५० वाजता सुटेल आणि दुस-या दिवशी ११.२५ वाजता पुण्याला पोहोचेल. उरुळी, दौंड कार्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, कजगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला आणि बडनेरा स्थानकावर या गाडीला थांबा असणार आहे. या रेल्वेगाडीत सेकंड क्लास चेअर कार १३, एसी चेअर कार क्लास १, स्लीपर क्लास १ आणि सेकंड जनरल क्लास १ कोच असतील.
माजी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहर हे औद्योगिक नगरी आणि पुणे शहर हे शिक्षणाचे माहेरघर असल्यामुळे या भागात आयटी कंपन्यांचा वेगाने विस्तार होत आहे. या दोन्ही शहरांमध्ये खान्देशातील जळगाव, भुसावळ, चाळीसगाव, कजगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव तसेच धुळे व नंदुरबार या भागातील अनेक नागरीक नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने स्थायीक झालेले आहेत. तसेच, लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम, विधी आदी महत्वाच्या कामांसाठी अनेकांना आपल्या मुळ गावी ये-जा करावे लागते. सध्या, पिंपरी चिंचवड, पुणे या शहरातुन जळगाव, भुसावळ येथे जाण्यासाठी दररोज सुमारे १०० ते १५० खाजगी ट्रॅव्हल्सच्या बसेस चालतात. तथापि, या खाजगी बसेसचे प्रवासभाडे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या सर्वसामान्य नागरिकांना ते आर्थिकदृष्या न परवडणारे आहे. या भागातील सर्वसामान्य नागरिकांची पुणे (लोणावळा किंवा चिंचवड) ते भुसावळ स्वतंत्र रेल्वेसेवा सुरु करण्याबाबत मागणी होती. त्याचा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री यांच्याकडे मागणीचा पाठपुरावा सुरू होता. त्याला यश आले असून या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.