खाद्यपदार्थांवरील जीएसटी मुळे बुरे दिन – काशिनाथ नखाते

0
336

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – केंद्र सरकारच्या धोरणामुळे वाढलेल्या प्रचंड महागाईत आधीच सर्वसामान्य नागरिक होरपळून जात असतानाच,अन्नधान्य आणि खाद्यपदार्थावर पाच टक्के वस्तू आणि सेवा कर लागू करणे म्हणजे दहा टक्क्यांनी दरवाढ झाली. आधीच महागाईत होरपळत असलेल्या घटकांवर आगीत तेल ओतण्याचा प्रकार झाला आहे. सर्वसामान्य नागरिकांचे दरमहा तीन ते पाच हजार रुपाये महिन्याचे बजेट वाढणार असून सर्वसामान्य नागरिकांना ही झळ बसली आहे. अच्छे दिनचे स्वप्न दाखवून बुरे दिन आलेले आहेत, अशी टीका कष्टकरी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, डाळीचे दर पाच ते दहा रुपयांनी अधिक वाढले आहेत. अन्नधान्य, कडधान्य, गूळ, दुग्धजन्य पदार्थ, पोहे, मुरमुरे, आटा, रवा,मैदा,तांदूळ,दही,गहू, ज्वारी या दररोज वापरात येणाऱ्या वस्तूवर तरी जीएसटी आकारू नये अशी सामन्यांची मागणी मोदी सरकारने झुगाराली आहे.

यामुळे कष्टकरी ,सामान्य वर्गाला वाईट दिवस आलेले आहेत. 18 जुलै पासून याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिक महिला भगिनींच्या बजेटमध्ये दरमहा तीन ते पाच हजार रुपये खर्चिक बाब झालेली आहे, याचा संताप नागरिक व्यक्त करीत आहेत .