खळबळजनक…! शिक्षिकेने इतर विद्यार्थ्यांकडून मुस्लिम मुलाला केली मारहाण, व्हिडिओ व्हायरल

0
719

देश,दि.२६(पीसीबी) – उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर येथे एका शाळेतील शिक्षिकेने वर्गातील इतर मुलांना मुस्लिम विद्यार्थ्याच्या कानफटात मारायला सांगितले. खब्बरपूर गावामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असून याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओ समोर येताच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी योगी सरकारवर हल्लाबोल चढवला आहे.

सदर व्हिडीओमध्ये शिक्षिका मुस्लिम समाजाबाबत वादग्रस्त विधान करताना दिसते. तसेच वर्गातील इतर मुलांना मुस्लिम विद्यार्थ्याला मारहाण करायलाही प्रोत्साहित करते. यानंतर वर्गातील काही मुलं मुस्लिम विद्यार्थ्याच्या कानफाटत तसेच पाठीत मारतात. आता या विद्यार्थ्याचा दाखलाही त्याच्या वडिलांनीही शाळेतून काढून टाकल्याचे समोर आले आहे. तसेच प्रवेश शुल्क परत करण्याच्या अटीवर त्यांनी शाळेविरोधात कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नाही असेही लिखीतमध्ये दिले आहे. मात्र याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये खळबळ उडाली आहे.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मन्सुरपूरचे एसपी सत्यनाराणय प्रजापत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, पोलिसांना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडीओची माहिती मिळाली. या व्हिडीओमध्ये महिला शिक्षिका गणिताचा पाढा लक्षात राहिला नाही म्हणून इतर विद्यार्थ्यांना त्यांच्याच वर्गमित्राला मारहाण करण्यास सांगताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह शब्दही ऐकू येत असून पोलीस याचा तपास करत आहेत. याबाबत शाळेच्या मुख्यध्यापकांशीही चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, व्हिडीओ समोर येताच काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला. एका शिक्षकाकडूनच निष्पाप मुलांच्या मनात भेदभावाचे विष ओतणे जात आहे. शाळेसारख्या पवित्र स्थानाला द्वेषाचा बाजार बनवला जात आहे. हे भाजपने पसरवलेले द्वेषाचे केरोसिन असून यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात आग लागली आहे. मुलं देशाचे भविष्य आहेत. त्यांचा द्वेष करू नका, सर्वांना मिळून प्रेम शिकवायचे आहे, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले.

त्याचबरोबर एमआयएमचे खासदार असदुद्दीने ओवैसी यांनीही या प्रकरणावर भाष्य केले आहे. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील आहे. एक शिक्षिकाच वर्गातील इतर मुलांना मुस्लिम विद्यार्थ्याला मारहाण करण्यास सांगत आहे. मुलाच्या वडिलांनी त्याचा दाखला शाळेतून काढून टाकला असून याविरोधात कोणतीही कारवाई करणार नाही असे लिखित दिले आहे, असे ट्विट ओवैसी यांनी केले.