खळबळजनक…! “या” राज्यात सापडले तब्बल १००० कोटींचे ड्रग्ज…

0
433

बडोदा,दि.१७(पीसीबी) – समुद्रातून येणारे ड्रग्ज गेल्या काही काळात मोठ्या प्रमाणात गुजरातमध्ये सापडलेले आहे. मात्र आता बडोद्यात बंधित एमडी ड्रग्ज तयार करणारी कंपनीच समोर आली आहे. बडोदा जिल्ह्यातील मोक्षी गावातील एका फॅक्टरीत 200 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 1 हजार कोटींच्या घरात आहे. एटीएसचे पोलीस महासंचालक दीपेन भद्रन यांनी सांगितले की – बडोद्याच्या सावली परिसरात ड्रग्जचा मोठा साठा असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर एटीएसने सोमवारी मोक्षी गावात या फॅक्टरीवर छापा घातला. त्या ठिकाणी मोठ्या ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच या ठिकाणी केमिकल बनवण्याच्या नावाखाली ड्रग्ज तयार करण्यात येत असल्याची माहितीही समोर आली आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत राही जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या तपासानंतरच संपूर्ण प्रकरण उघड होऊ शकणार आहे.

या ठिकाणी पकडण्यात आलेले ड्रग्ज हे मुंबई आणि गोव्यात पाठवण्यात येत होते. देशातील इतरही भागात हे ड्रग्ज पाठवण्यात येत होते, असा संशय एटीएसला आहे. हे रॅकेट किती मोठे आहे आणि त्यात कुणाकुणाचा सहभाग आहे, याची माहिती आता घेण्यात येते आहे.

दीपेन भद्रन यांनी पुढे सांगितले की जप्त करण्यात आलेले ड्रग्ज हे सहा महिन्यांपूर्वी तयार करण्यात आले होते. हा छापा घालण्यापूर्वी या फॅक्टरीतून मोठ्य़ा प्रमाणात ड्रग्ज तयार झाले असावे आणि त्याचा पुरवठा देशभरात करण्यात आला असावा, असा संशयही व्यक्त करण्यात येतो आहे.

हे ड्रग्ज मिथाइलीनन डायऑक्सी, मथैमफेटामाईन आणि मेफेड्रोन अशा वेगवेगळ्य नावांनी ओळखले जाते. प्रत्येक देशात याची वेगवेगळी कोड नावे आहेत. हे ड्रग्ज श्वासातून किंवा पाण्यातून घेतले जाते. नशेच्या बाजारात याच्या एक ग्रॅमची किंमत 25 हजार रुपये इतकी आहे. नशा करणाऱ्यांत या ड्रग्जची वेगवेगळी नावेही आहेत. हे ड्रग्ज घेतल्यानंतर मेंदूत नशा चढते, धुंदी येते. मोठ्या प्रमाणात आणि स्तात्याने हे घेतल्याने जीवाला धोका होण्याचीही शक्यता असते.