खळबळजनक! मुळशीमध्ये शिक्षकाने केला तब्बल १९ विद्यार्थिनींचा विनयभंग

0
136

मुळशी, दि. ६ (पीसीबी) –

बदलापूर आणि दौंड येथील शाळेतील मुलींवरील लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असताना आता मुळशी तालुक्यातील आनंदगाव येथील शाळेत तब्बल १९ अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. शाळेतील शिक्षकानेच या मुलींचा विनयभंग केल्याचे समोर आले आहे. या घटनेने पुणे जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी संबंधित शिक्षकाच्या विरोधात शाळेच्या संस्थाचालकांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. जालिंदर नामदेव कांबळे (रा. लोणी काळभोर, पुणे) असे नराधम शिक्षकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा विद्या विकास मंडळची मुळशी तालुक्यातील आनंदगाव या ठिकाणी एक शाळा आहे. या संस्थेच्या कार्यकारी समितीला माहिती मिळाली की, संबंधित शाळेतील उपशिक्षक जालिंदर नामदेव कांबळे हा विद्यार्थिनींना शारिरीक मारहाण व शिकवताना अश्लिल भाषेत बोलतो. तसेच शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न करतो. त्यानुसार पाच सप्टेंबर रोजी संस्थेच्या कार्यकरणी समितीमधील सदस्य शाळेत चौकशीसाठी गेले. त्यावेळी १९ विद्यार्थिनींनी सदस्यांना संबंधित शिक्षकाविषयी लेखी अर्ज दिले. त्यामध्ये विद्यार्थिनींनी नमुद केले की, शिक्षक जालिंदर कांबळे हा शिकवताना विनाकारण फळ्यावर मुका, किस, पप्पी असे शब्द लिहायचा. तसेच शिकवताना मामाने मामीला मळ्यात मिठी मारली, असे म्हणायचा.

एवढेच नाही तर जालिंदर कांबळे याने शाळेत खेळणाऱ्या एका मुलीच्या डोळ्याला पट्टी बांधत तिला मिठी मारली. त्यावेळी इतर विद्यार्थी ओरडल्याने त्याने तिला सोडले. कांबळे हा वर्गामध्ये विनाकारण विद्यार्थिनींच्या अत्यंत जवळ जावुन कानामध्ये बोलायचा व मोठ्याने कानात ओरडायचा. तसेच हाताला स्पर्श करून डोक्यावर डोके आपटत असे व त्यास विरोध केल्यास मुलींना मारहाण करायचा. काबंळे हा वर्गामध्ये ‘पाऊस पडला, भिजले अंगण, पाय घसरला, सुजले ढुंगण’ अशा कविता करायचा. त्यामुळे शाळेतील विद्यार्थिनींच्या लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करायचा, असे तक्रारीत नमूद केले आहे.

2024 मध्ये जुन महिन्यात शाळा सुरु झाल्यापासुन जालिंदर कांबळे हा शाळेतील विद्यार्थिनींना शारिरीक मारहाण व शिकविताना अश्लिल भाषेत बोलणे, तसेच शारीरिक लगट करणे, अशा प्रकारचे कृत्य करत होता. त्यामुळे शाळेतील विद्यार्थिनींच्या मनात लज्जा उत्पन्न होत होती म्हणून त्यांनी संस्थेच्या कार्यकिरणी समितीकडे लेखी तक्रार केली आहे. त्यानुसार संस्थाचालकांनी शिक्षक जालिंदर कांबळे यांच्याविरोधात तक्रार दिली आहे.