खळबळजनक : फडणवीस यांंनी धनंजय मुंडेंची पत्नी करुणा शर्मा यांना अनेकदा विमानाने माहेरी सोडले…

0
4

दि. 18 (पीसीबी) – बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराड याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचे सांगत विरोधकांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना खळबळजनक आरोप केला आहे.
तृप्ती देसाई यांनी आरोप केला की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धनंजय मुंडे यांचे मित्र असल्यामुळे मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही. फडणवीस यांनी अनेकदा मुंडेंच्या मैत्रीखातर त्यांच्या पत्नी करुणा शर्मा यांना विमानाने माहेरी सोडले आहे.”
संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणि खंडणी प्रकरणात आरोपी वाल्मिक कराड सध्या SIT च्या ताब्यात आहे. तृप्ती देसाई यांच्या मते, “जेव्हा पोलीस कराडचा शोध घेत होते, तेव्हा तो नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीच्या आण्णासाहेब मोरे यांच्या आश्रमात १५ आणि १६ डिसेंबर रोजी मुक्कामाला होता आणि १७ डिसेंबरला तो निघून गेला होता. जर कराडला या आश्रमात आश्रय दिला गेला असेल, तर त्या आश्रमाचे प्रमुख आण्णासाहेब मोरे यांच्यावरही कारवाई करावी. तसेच, CID पथकाने आश्रमाच्या CCTV फुटेजमध्ये कराड आणि विष्णू चाटे यांना पाहिले होते, परंतु हे पुढे का सांगितले गेले नाही, याचाही तपास गृहमंत्र्यांनी करावा.”

तृप्ती देसाई यांनी आरोप केला की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आण्णासाहेब मोरे यांच्यात चांगले संबंध आहेत, त्यामुळे हे प्रकरण उघडकीस येत नाही. मागील वर्षी आश्रमात काही चुकीचे प्रकार घडले होते, ज्याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेण्यात आली होती. जर आध्यात्मिक स्थळावर आरोपींना थारा दिला जात असेल, तर त्या ठिकाणच्या प्रमुखांवरही कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.”

मुख्यमंत्र्यांकडून मुंडे यांना पाठींबा?
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडे यांचे रक्षण करत आहेत का?” असा सवाल उपस्थित करत तृप्ती देसाई म्हणाल्या, “मंत्रिमंडळातील निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो, आणि इतके गंभीर आरोप असूनही मुंडे यांचा राजीनामा घेतला गेला नाही. यावरून असे स्पष्ट होत आहे की, फडणवीस आणि अजित पवार दोघेही मुंडे यांना वाचवत आहेत. जर हे असेच सुरू राहिले, तर या दोघांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही.

वाल्मिक कराडच्या बेनामी संपत्तीचा शोध लागत आहे आणि अनेक गुन्हे समोर येत आहेत. तृप्ती देसाई यांनी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “गुन्ह्यांचा तपास व्यवस्थित होत नाही, CID किंवा SIT पथकांची नेमणूक करावी लागते, अधिकारी निलंबित किंवा बदली केले जातात. यामुळे राज्यात नेमके काय चालले आहे,” याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. तृप्ती देसाई यांनी सांगितले की, “जेव्हा करुणा शर्मा त्यांच्याकडे तक्रार घेऊन आल्या होत्या, त्यावेळी त्यांनी सांगितले होते की, धनंजय मुंडे यांचे मित्र देवेंद्र फडणवीस त्यांना विमानाने सोडायचे. त्यामुळे मुंडे यांच्या मित्रत्वामुळे तपासात हस्तक्षेप होण्याची शक्यता आहे. तसेच, त्या आश्रमाच्या आर्थिक स्रोतांवरही चौकशी व्हावी.”