खळबळजनक ! तलाठी भरतीचा पेपर फुटला? परीक्षेला गालबोट

0
326

नाशिक, दि. १८ (पीसीबी) – तलाठी भरती परीक्षेच्या पहिल्याच दिवशी येथील एका केंद्रावर पेपर फुटल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. एका व्यक्तीच्या भ्रमणध्वनीमध्ये प्रश्नांची छायाचित्रे आढळून आली असली तरी प्रथमदर्शनी हा आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कॉपी करण्याचा प्रकार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र या प्रकारामुळे तब्बल चार वर्षांनी होत असलेल्या परीक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

१० लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यामुळे तलाठी भरती परीक्षा एकाच वेळी न घेता टप्प्याटप्प्याने होणार आहे. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी, गुरूवारी येथील म्हसरूळच्या केंद्राबाहेर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडे टॅब, दोन भ्रमणध्वनी, वॉकी टॉकी, हेडफोन असले अत्याधुनिक साहित्य आढळून आले. त्याच्या झडतीमध्ये भ्रमणध्वनीमध्ये तलाठी परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांचे छायाचित्र आढळून आले आहे. त्यामुळे पेपर फुटल्याची चर्चा रंगली असतानाच तपास यंत्रणेने मात्र ही शक्यता नाकारली आहे.

संशयिताची तातडीने चौकशी सुरू केली असून तो काही परीक्षार्थीना कॉपी पुरवित असल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याचे नाशिकचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सांगितले. या प्रकारात आणखी तीन-चार जण सहभागी असण्याची शक्यता असून त्यांचा तपास सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. तर या प्रकरणी पोलिसांना संपूर्ण सहकार्य करण्यात येत असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी सांगितले. परीक्षा घेणाऱ्या टीसीएस संस्थेकडून काही तांत्रिक माहिती हवी असल्यास तसेच लेखी पत्र देण्याची सूचनाही पोलिसांना केल्याची वाघ म्हणाले.