खऱ्या ओबीसीला उमेदवारी द्या अन्यथा…

0
2
  • लक्ष्मण हाके यांचा राजकीय पक्षांना इशारा

मुंबई, दि. ५ -कोणाचा डीएनए ओबीसी आहे हे तिकीट वाटपावरून समजेल, असा टोला ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी भाजपला लगावलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचा डीएनएच ओबीसी असल्याचे वक्तव्य केले होते. याचाच संदर्भ देत या निवडणुकांमध्ये खऱ्या ओबीसींना किती तिकिटे मिळतात, यावरून कोणाचा डीएनए (DNA) ओबीसी आहे ते समजेल, असा टोला लगावला आहे.

नगरपालिका निवडणुका कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आज लक्ष्मण हाके यांनी भाजपसह सर्वच पक्षांना इशारा दिला आहे. ओबीसी समाजाला फक्त पंचायत राज निवडणुकीतच आरक्षण आहे. या ठिकाणी जर कोणत्या पक्षाने खऱ्या ओबीसीला डावलून बोगस ओबीसीला उमेदवारी दिल्यास त्याचा करेक्ट कार्यक्रम करू, असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सर्व पक्षांना दिला आहे. काल नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका जाहीर झाल्यानंतर आज हाके यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना राज्यात जवळपास 77 ओबीसी नगराध्यक्ष असून 1,800 ओबीसी नगरसेवक निवडून येणार आहेत. अशावेळी जर जरांगेंच्या मार्फत ओबीसी झालेल्या मराठा उमेदवाराला उमेदवारी दिल्यास कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याच्या विरोधात प्रचारातही उतरणार आणि त्या पक्षाचे इतर ठिकाणचे उमेदवार ही पराभूत करणार, असाही इशारा हाके यांनी दिला.

दरम्यान, मनोज जरांगे हा फक्त चेहरा होता. त्याच्याकडून ज्यांनी ओबीसी आरक्षण संपवायचा प्रयत्न केला, त्यांना महाराष्ट्रातला ओबीसी समाज चांगला ओळखत आहे. असे सांगताना समाजाने फक्त खऱ्या ओबीसीलाच मतदान करून निवडून आणावे, असे आवाहनही हाके यांनी केले आहे. जरी प्रचाराला वेळ कमी असला तरी जिथे जिथे बोगस ओबीसी निवडणूक रिंगणात असेल, तिथे जाऊन त्या पक्षाच्या विरोधात प्रचार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नुसता डीएनए ओबीसीचा आहे म्हणून चालणार नसून किती खऱ्या ओबीसींना उमेदवारी देताय, हेही समाज पाहत असल्याचा टोला हाके यांनी भाजपालाही लगावला. एकदा उमेदवारांची यादी बाहेर आल्यानंतर प्रचाराच्या सात दिवसात महाराष्ट्राला विधानसभेनंतर पुन्हा एकदा ओबीसीची ताकद दाखवून देऊ, असेही हाके यांनी सांगितले आहे.
तर प्रचाराचा कालावधी कमी असला तरी आम्ही काय आज लंगोट बांधलेली नाही, असे सांगत गरज पडेल तिथे व्हिडिओ तयार करून पाठवू आणि गरज पडेल तिथे थेट प्रचाराचा धडाका लावू, असेही हाके यांनी सांगितले आहे. कोणता पक्ष किती बोगस ओबीसींना तिकीट देतो, त्यावर त्या पक्षाचे भवितव्य अवलंबून असेल असे सांगत जरांगेची ताकद दहा टक्के आहे. आम्ही 60 टक्के आहोत त्यामुळे जरांगेंच्या स्टेजवर जाणाऱ्या आमदारांनीही याची जाणीव ठेवावी, असा इशारा त्यांनी दिला आहे. या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा विधानसभेत दाखवली तशी ओबीसीची ताकद या निवडणुका पाहायला मिळेल असे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी सांगितले.