खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच – देवेंद्र फडणवीस

0
131

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – दसरा मेळाव्याच्या निमित्ताने बुधवारी मुंबईत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही प्रमुख नेत्यांनी एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप केले. अनेक राजकीय मुद्द्यांवरून एकमेकांवर टोलेबाजीही करण्यात आली. दोन्ही बाजूच्या नेतेमंडळींनी केलेल्या भाषणांमुळे मुंबईतलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. दोन्ही नेत्यांनी केलेल्या भाषणांवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर मीडियाशी बोलताना खोचक शब्दांत टीका केली आहे. तसेच, खरी शिवसेना कोणती, हे एकनाथ शिंदेंनी दाखवून दिल्याचंही ते म्हणाले.

“ज्या प्रमाणात लोक बीकेसीच्या मैदानावर पाहायला मिळाले ते पाहाता काल एकनाथ शिंदेंनी हे दाखवून दिलं की खरी शिवसेना कोणती. त्या मैदानाची क्षमता शिवाजी पार्कपेक्षा दुप्पट आहे. पण तरीही तिथे तुडुंब गर्दी होती. महाराष्ट्रभरातून लोक आले होते. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच, हे कालच्या मेळाव्यात प्रस्थापित केलं आहे. यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो”, असं फडणवीस म्हणाले.

एकनाथ शिंदेंनी विकासाच्या मुद्द्यांना हात घातला असं म्हणत फडणवीसांनी यावेळी उद्धव ठाकरेंच्या आधीच्या भाषणांची तुलना केली आहे. “आम्ही काय करतोय, काय करणार आहे हे एकनाथ शिंदेंनी भाषणात सांगितलं. मागच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हे होत नव्हतं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते पक्षप्रमुखाचंच भाषण करायचे. त्यांनी एकही भाषण मुख्यमंत्र्याचं केलं नाही”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर खोचक टोला लगावला. “शिमग्यावर कधीही प्रतिक्रिया देत नसतात”, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणातील प्रत्येक मुद्द्यावर हे एकच उत्तर असल्याचं सांगितलं.

एकनाथ शिंदे भाजपाची स्क्रिप्ट घेऊन बोलतात, असा आरोप करणाऱ्या उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “असं जे म्हणत आहेत, त्यांनी आपला स्क्रिप्टरायटर बदलायला हवा. तेच ते, तेच ते.. किती वेळा तीच स्क्रिप्ट. एकतर तुमच्या स्क्रिप्टरायटरला क्रिएटिव्हिटी दाखवायला सांगा, नाहीतर नवीन स्क्रिप्टरायटर आणा. आम्हालाही हे ऐकून कंटाळा आला आहे”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.