“खरा गझलकार बेहिशेबी असतो!” – दिलीप पांढरपट्टे

0
168
  • एक दिवसीय गझल संमेलन

पिंपरी,दि. ११ (पीसीबी) – “खरा गझलकार बेहिशेबी असतो! गझल आकलनासाठी सोपी असावी. शब्दार्थाच्या पलीकडे जाऊन कवींनी नित्यनूतन लिहून जगाला कवेत घेण्याचा प्रयत्न करावा!” असे विचार माजी सनदी अधिकारी आणि ज्येष्ठ गझलकार दिलीप पांढरपट्टे यांनी शान्ता शेळके सभागृह, संत तुकाराम संकुल, निगडी प्राधिकरण येथे रविवार, दिनांक १० मार्च २०२४ रोजी व्यक्त केले. स्नेहल आर्टस् अॅण्ड एज्युकेशन सोसायटी, डोंबिवली आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय गझल संमेलनात माजी प्राचार्या कल्पना गवरे लिखित ‘कल्पनेचा फुलोरा’ या मराठी गझलसंग्रहाचे प्रकाशन करताना दिलीप पांढरपट्टे बोलत होते.

ज्येष्ठ गझलकार म. भा. चव्हाण अध्यक्षस्थानी होते; तसेच डॉ. इक्बाल मिन्ने, सुनंदा पाटील उर्फ गझलनंदा, रघुनाथ पाटील, महाराष्ट्र साहित्य परिषद – पिंपरी चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे, स्नेहल आर्टस् अॅण्ड एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष कल्पना गवरे, उपाध्यक्ष रवींद्र सोनवणे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. डॉ. इक्बाल मिन्ने म्हणाले की, “‘कल्पनेचा फुलोरा’ या गझलसंग्रहात काही नवखेपणाच्या खुणा असल्यातरी अल्पावधीतच कल्पना गवरे यांनी गझलविधा आत्मसात केली, हे खूप कौतुकास्पद आहे!” सुनंदा पाटील यांनी, “माझ्या गझलशिष्येचा गझलसंग्रह प्रकाशित होत आहे, ही आनंदाची बाब आहे!” असे गौरवोद्गार काढले. राजन लाखे यांनी, “साहित्यनिर्मिती आणि आस्वाद हा एकांताचा उत्सव असला तरी त्याचे सामुदायिक आविष्करण सर्वांसाठी आनंदनिधान ठरते!” असे मत व्यक्त केले.

गझलकारा कल्पना गवरे यांनी आपल्या मनोगतातून, “शालेय वयात पहिली कविता सुचली तरी ती हिंदी भाषेत होती. त्यावेळी शेरोशायरीची आवड निर्माण झाली. विवाहपश्चात मराठी माध्यमात अध्यापन करण्याची संधी मिळाली. आंतरशालेय स्पर्धांमध्ये असंख्य विद्यार्थी तयार केले. त्यामुळे मीसुद्धा घडत गेले. पहिला कवितासंग्रह २००५मध्ये प्रकाशित झाला; तसेच सुमारे ५५० कवितांना स्वरबद्ध केले. निवृत्तीनंतर जाणीवपूर्वक गझललेखनाकडे वळले. यासाठी अनेकांचे मार्गदर्शन लाभले!” अशा शब्दांतून आपला लेखनप्रवास कथन केला.

प्रकाशनापूर्वी, अतुल दिवे आणि वैशाली राजेश यांनी संमेलनातील सहभागी गझलकारांच्या रचनांचे सुश्राव्य सादरीकरण केले. त्यामध्ये “तुझ्या लाजण्याचा इशारा पुरेसा…”, ” मनाप्रमाणे जगून घे…” , “साथ दे तू मला…”, ” आयुष्य छान आहेच…” , “येथे मनाप्रमाणे जगता कधीच न आले…”, ” लाजून हसण्याचा हव्यास होता…” , “सोसून दु:ख सारे…”, ” तुझे ओठ सजणे…” , “काल स्वप्नात येऊन…” अशा रचनांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. श्रीकृष्ण ढोबळे (तबला) आणि नितीन खंडागळे (की बोर्ड) यांनी साथसंगत केली. दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन आणि रिचा राजन यांनी सादर केलेल्या ईशस्तवनाने संमेलनाचा प्रारंभ करण्यात आला. रवींद्र सोनवणे यांनी प्रास्ताविकातून, “स्नेहल आर्टस् अॅण्ड एज्युकेशन सोसायटी ही संस्था शैक्षणिक कार्यासोबत सामाजिक जाणिवेतून अनेक उपक्रम राबविते. संस्थेच्या माध्यमातून कल्पना गवरे यांनी देशभरात आणि परदेशात कळसूत्री बाहुल्यांचे नाट्य या उपक्रमातून सातत्याने प्रबोधनाचे कार्य केले आहे!” अशी माहिती दिली.

कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त मंगला पाटसकर (साहित्य), डॉ. मनाली वैद्य आणि डॉ. शैलजा माने (वैद्यकीय), कल्पना गवरे (शैक्षणिक), अश्विनी पवार (पत्रकारिता) यांना सन्मानित करण्यात आले.

मराठी गझल मुशायरा या सत्रात म. भा. चव्हाण, दिलीप पांढरपट्टे, आप्पा ठाकूर, सुनंदा पाटील, रघुनाथ पाटील, कल्पना गवरे आणि रवींद्र सोनवणे यांच्या वैविध्यपूर्ण गझलांना रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक बशीर मुजावर, सुहासिनी शिरढोणकर, मकरंद गोंधळी, पांडुरंग कुलकर्णी, दीपक पटेकर, विनीता ऐनापुरे, डॉ. रजनी शेठ, मनोज जगताप, अजित कारंडे, अनुप कुमार, सुभाष मोहनदास, अनिल गुंजाळ आणि पिंपरी – चिंचवड परिसरातील मान्यवर साहित्यिकांची सभागृहात उपस्थिती होती. स्नेहल आर्टस् अॅण्ड एज्युकेशन सोसायटी, डोंबिवली आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखा यांच्या पदाधिकाऱ्यांनी संयोजनात सहकार्य केले. संतोष घुले यांनी सूत्रसंचालन केले. रवींद्र सोनवणे यांनी आभार मानले.