खराडीच्या पंतप्रधान आवास योजनेत ७० टक्के भाडेकरू!

0
84

सामान्य नागरिकांच्या घराच्या स्वप्नाला लागतोय सुरुंग, पालिका अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने घरमालक निवांत, भाडेकरूंची माहिती तपासण्याची मागणी

पुणे, १९ जुलै (पीसीबी) – सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी पंतप्रधान आवास योजनेतून अल्पदरात घरे उपलब्ध करून दिली जातात. ही योजना शहरात स्वतःचे घर नाही, अशा नागरिकांसाठी पालिकेकडून राबिवण्यात येते. मात्र पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने खराडीतील प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांत मालकांनी भाडेकरू ठेवले असून दोन्ही सोसायट्यांचा विचार केला तर जवळजवळ ७० टक्के भाडेकरू येथे राहत असल्याची धक्कादायक माहिती ‘सीविक मिरर’ला मिळाली आहे. त्यामुळे प्रकल्पात राहात असलेल्या भाडेकरूंची माहिती तपासण्याची मागणी होत आहे.

सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न आजच्या महागाईच्या काळात सहज शक्य होत नाही. असे असले तरी आर्थिक दुर्बल घटकांसाठी सरकारकडून त्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे. अशा व्यक्तींना नियम, अटींच्या अधिन योजनेतून घर मिळते. ही योजना सरकारी असल्याने योजनेतील घर ज्या व्यक्तीच्या नावावर आहे, त्याने तसेच त्याच्या कुटुंबीयांनी राहणे अपेक्षित आहे. मात्र खराडीत खुद्द घरमालकांनीच भाडेकरू ठेवले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे खरेच घर नसलेल्या व्यक्तींना घर मिळाले आहे की, कोणाच्या आशीर्वादाने घर योजनेत घेतले आहे, असा गंभीर प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जाऊ लागला आहे.

खराडी हा परिसर आयटी पार्क असल्याने या भागातील जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. तसेच सदनिकेचे दर हे कोट्यवधींच्या घरात आहेत. त्यामुळे या भागात सर्वसामान्य व्यक्तीला घर खरेदी करणे आवाक्याबाहेर आहे. त्यामुळेच पंतप्रधान आवास योजनेला या भागात चांगला प्रतिसाद मिळाला. यातील खराडी येथील प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. ज्यांचे शहरात स्वतःचे घर नाही, अशा कुटुंबांना परवडणार्‍या किमतीमध्ये घर उपलब्ध करून देणे, हा पीएम आवास योजनेचा मूळ उद्देश आहे. योजनेचा अर्ज भरताना स्वतःच्या नावावर घर नाही, मिळालेले घर भाड्याने देणार नाही, असे प्रतिज्ञापत्र द्यावे लागते. असे असतानाही खराडीतील प्रकल्पातील अनेक सदनिका लाभार्थ्यांनी भाड्याने दिली आहेत. ज्यांना घर मिळाले आहे, ते स्वत: या घरात राहात नसून भाडेकरूंना ठेवल्याने ज्यांना घराची गरज होती ते लाभापासून वंचित राहिलेत का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत महापालिकेने शहरात ८ हजारांहून अधिक सदनिका निर्माण करण्याचे नियोजन केले आहे. या योजनेतून महापालिका हद्दीत ज्यांचे घर नाही, अशा नागरिकांना परवडणार्‍या किमतीत हक्काचे घर देण्यासाठी महापालिकेने हडपसर, खराडी आणि वडगाव खुर्द येथे एकूण २६५८ सदनिका निर्माण केल्या आहेत.

अधिकारीच भागीदार?
खराडीतील पीएम आवास योजनेत भाडेकरू ठेवणाऱ्यांना पालिकेच्या अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्याची माहिती एका नागरिकाने ‘सीविक मिरर’ला दिली. या प्रकल्पातील एका सदनिकेला १६ ते १७ हजार भाडे प्रतिमहिना आहे. या भाड्यात महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी देखील वाटा दिला जात असल्याचे खासगीत बोलले जात आहे. त्यामुळे राखण ठेवणारे मलीदा खात असल्याने कारवाई कोण करणार असाही प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत पंतप्रधान आवास योजनेची जबाबदारी असलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्याला विचारले असता, कोणत्याही महापालिकेच्या अधिकाऱ्याकडून पैसे घेतले जात नाहीत. या प्रकल्पात खरेच भाडेकरू राहतात का याची तपासणी केली जाईल. तसेच या योजनेतील घरमालकाला घर भाड्याने देता येते का याबाबत काही नियम बदलले आहेत का त्याची तपासणी केली जाईल असे सांगितले. त्यानंतर पुन्हा या नियमाबाबत विचारण्यासाठी संपर्क साधला असता कोणताही प्रतिसाद दिला नाही.

भाडेकरू सापडले, कारवाई नाही
वडगाव शेरी आणि खराडीत पीएम आवास योजनेत घरमालकांनी भाडेकरूंना ठेवल्याची माहिती समोर आली होती. पाच भाडेकरू राहात असल्याचे आढळून आले होते. मात्र त्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली जाईल, असे जाहीर केले होते. मात्र त्यानंतर कोणतीही कारवाई झाली नाही. या सदनिका भाड्याने देणाऱ्या लाभार्थ्यांना साधी नोटीस बजावण्याचे कष्टही अधिकाऱ्यांनी घेतले नव्हते. खराडीत अद्याप काहीच कारवाई करण्यात आलेली नाही.

प्रधानमंत्री आवास योजनेची स्थिती
एकूण घरांची निर्मिती – २ हजार ६५८
वडगाव खुर्द प्रकल्पात घरे एकूण- १ हजार १०८ (शिल्लक – १६९, प्रतीक्षा – ३०९)
हडपसरमधील तीन प्रकल्प – एकूण- ७६४ (शिल्लक- १७५, प्रतीक्षा- २४२)
खराडी प्रकल्प – एकूण- ७८६