खबरदार… दोन वेळा मतदान कराल तर अडकाल

0
162

नवी दिल्ली,दि. १६ (पीसीबी) – संपूर्ण देशभराचे लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकांची तारीख आज अखेर जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिदषद घेऊन ही घोषणा केली. 19 एप्रिल पासून देशभरात लोकसभा निवडणुकांसाठी मतदान होणार असून 1 जून रोजी अखेरच्या टप्प्यातील मतदान होईल. तर 4 जूनला लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार असून निकाल जाहीर होईल. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज ही घोषणा केली. मात्र निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यापूर्वी राजीव कुमार यांनी अनेक महत्वाच्या घोषणाही केल्या. निवडणुकीदरम्यान राजकीय पक्ष आणि नेत्यांसाठी नियमावलीही जाहीर करण्यात आली. तसेच मतदारांसाठी कोणत्या सुविधा देण्यात आल्या आहेत हेही त्यांनी जाहीर केली. यावेळी त्यांनी अनेक महत्वाच्या सूचनाही केल्या.

2 वेळा मतदान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार
आगामी निवडणुकीदरम्यान दोन वेळा मतदान करणाऱ्यांवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिला आहे. तसेच निवडणुकीत कोणत्याही प्रकारे पैशाचा गैरवापर होऊ देणार नाही. मनी आणि मसल पॉवरला निवडणुकीत थारा राहणार नाही. दारू आणि साड्या वाटपावर आमची करडी नजर राहणार असून असा प्रकार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

– ज्या ठिकाणी इतर पक्षांच्या सभा सुरू आहेत त्या ठिकाणी कोणत्याही पक्षाने मिरवणूक काढू नये. एका पक्षाने लावलेली पोस्टर्स दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काढू नयेत.

– राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी त्यांच्या समर्थकांनी इतर पक्षांच्या सभा किंवा मिरवणुकीत अडथळे निर्माण करणार नाहीत किंवा त्यांना अडथळा आणण्याचा प्रयत्न करणार नाही याची काळजी घ्यावी.

– नेते आपल्या समर्थकांना त्याच्या परवानगीशिवाय कोणत्याही व्यक्तीची जमीन, इमारत, परिसर भिंती इत्यादींवर झेंडे लावण्याची, बॅनर लावण्याची, माहिती पेस्ट करण्याची आणि घोषणा लिहिण्याची परवानगी देऊ शकत नाहीत.

– मतदारांना लाच देणे, त्यांना धमकावणे, मतदान केंद्रापासून 100 मीटरच्या आत प्रचार करणे हे गुन्हेगारी कृत्य मानले जाईल.

– मतदानाच्या ४८ तास आधी निवडणूक प्रचार आणि सार्वजनिक सभांवर बंदी लागू होईल.

– मंदिर, मशीद किंवा इतर कोणत्याही प्रार्थनास्थळाचा निवडणूक प्रचारासाठी वापर करू नये.

– विविध जाती आणि समुदायांमध्ये मतभेद किंवा द्वेष वाढवणाऱ्या क्रियाकलापांमध्ये गुंतू नका. विद्वेष पसरवणारे वक्तव्य करू नका.

– कोणत्याही पक्षाच्या, नेत्याच्या किंवा कार्यकर्त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य करू नका.