खड्डे तातडीने बुजवा; आयुक्तांचे निर्देश

0
242

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – रस्त्यांवरील खड्डे तसेच पावसामुळे पाणी साचले असल्याच्या तक्रारी येत आहेत, अशा परिस्थितीत जनसंवाद सभेच्या मुख्य समन्वय अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारींची गंभीरतेने दखल घेऊन संबंधित क्षेत्रीय अधिकारी आणि कार्यकारी अभियंता यांच्या समवेत शहराच्या विविध भागांची क्षेत्रीय स्तरावर संयुक्त पाहणी करुन या समस्यांवर तातडीने उपाययोजना करावी, असे आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी दिले.

या पार्श्वभूमीवर जनसंवाद सभेनंतर संबंधित क्षेत्रीय अधिकारी आणि कार्यकारी अभियंता यांच्या समवेत मुख्य समन्वय अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय कार्यक्षेत्रातील रस्ते आणि परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजवावेत तसेच ज्या भागात पाणी साचते तेथे वेळेत उपाययोजना कराव्यात अशा सूचना मुख्य समन्वय अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना दिल्या. महापालिका यंत्रणा युद्धपातळीवर खड्डे बुजवण्याचे काम सुरु असून खड्ड्यांसंदर्भात नागरिकांच्या आलेल्या तक्रारींचा निपटारा केला जात आहे.

दरम्यान, महापालिकेच्या वतीने आज आठही क्षेत्रीय कार्यालयात पार पडलेल्या जनसंवाद सभेत सुमारे 66 नागरिकांनी सहभाग घेऊन तक्रारवजा सूचना मांडल्या. आजची ही अठरावी जनसंवाद सभा होती. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी तसेच तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या आदेशानुसार महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जनसंवाद सभा सुरु करण्यात आल्या. आजपर्यंतच्या जनसंवाद सभांमध्ये सुमारे 1921 नागरिकांनी सहभाग घेतला. महापालिका प्रशासनाला विविध सूचना करत प्रशासन गतिमान करण्यासाठी नागरी सहभाग महत्वपूर्ण भूमिका बजावत असून जनसंवाद सभा यासाठी प्रभावी दुवा ठरली आहे.

अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयामध्ये आज झालेल्या जनसंवाद सभांमध्ये अनुक्रमे 16, 4, 2, 6, 6, 4, 18 आणि 10 इतक्या नागरिकांनी उपस्थित राहून आपले म्हणणे मांडले. अ, ब, क, ड, ई, फ, ग, ह या क्षेत्रीय कार्यालयांच्या जनसंवाद सभेचे अध्यक्षपद मुख्य समन्वय अधिकारी अनुक्रमे पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, शहर अभियंता मकरंद निकम, भूमि व जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी, समाज विकास विभागाचे उपआयुक्त अजय चारठाणकर, सहशहर अभियंता सतीश इंगळे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, उपआयुक्त चंद्रकांत इंदलकर, पर्यावरण विभागाचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी भूषवले. तसेच आठही क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी अनुक्रमे शीतल वाकडे, अभिजित हराळे, अण्णा बोदडे, उमाकांत गायकवाड, राजेश आगळे, सीताराम बहुरे, विनोद जळक, विजयकुमार थोरात हे उपस्थित होते. आठही क्षेत्रीय कार्यालयातील जनसंवाद सभेत स्थापत्य, जलनिस्सारण, पाणीपुरवठा, विद्युत, झोपडपट्टी निर्मुलन आणि पुनर्वसन, नगररचना इत्यादी विभागांचे कार्यकारी अभियंता उद्यान, वैद्यकीय, आरोग्य, करसंकलन विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

आज झालेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी विविध मागण्या व सूचना मांडल्या. त्यामध्ये ड्रेनेज लाईनची कामे करावीत, महापालिकेच्या आरक्षित जागांवर फलक लावावेत, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, रहदारीस अडथळा ठरणाऱ्या ड्रेनेज लाईनची अपूर्ण कामे त्वरित पूर्ण करावीत, स्मशानभूमीची सीमाभिंत उंच करावी, शास्त्रोक्त मानंकापेक्षा अधिक उंचीचे गतिरोधक हटवून आवश्यक असणा-या ठिकाणीच गतिरोधक असावेत, सुरक्षेच्या दृष्टीने झोपडपट्टी भागात सीसीटीव्ही बसवावेत आदी सूचना नागरिकांच्या वतीने जनसंवाद सभेत करण्यात आल्या.