खडतर मेहनत, विश्वासाने ध्येयाचा पाठपुरावा केल्यास यश निश्चित मिळते- शेखर सिंह

0
310

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना स्वतःची क्षमता ओळखून योग्य वेळी निर्णय घेणे गरजेचे आहे. ध्येय नक्की काय आहे आणि ते आपल्याला का साध्य करायचे, हे अगोदर ठरवून त्या दिशेने वाटचाल करणे आवश्यक आहे. खडतर मेहनत करून विश्वासाने ध्येयाचा पाठपुरावा केल्यास यश निश्चित मिळते, असे मार्गदर्शन महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महापालिका, पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड आणि डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने “अर्बन आऊटकम्स फ्रेमवर्क 2022” अंतर्गत पिंपरी येथील डॉ.डी.वाय.पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सभागृहामध्ये विद्यार्थ्यांसाठी ‘लक्षवेध- क्रॅकिंग द कोड’ हा मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी आयुक्त बोलत होते. सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले, डॉ.डी.वाय.पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पिंपरीचे सचिव डॉ. सोमनाथ पाटील, फॉक्सबेरीचे सीईओ अंकित भार्गव, फार्मदीदी संस्थेचे सहसंस्थापक अनुक्रीत जोहारी या मान्यवरांनी प्रमुख वक्ते म्हणून विद्यार्थ्यासोबत संवाद साधला.

यावेळी, स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, प्राचार्य डॉ.एल.के. वाधवा, कार्यकारी संचालक प्रा. अविनाश ठाकूर, डीन प्रा. धीरज अग्रवाल, उपायुक्त रविकिरण घोडके, विशेष अधिकारी किरण गायकवाड यांच्यासह स्मार्ट सिटी व स्मार्ट सारथी टीमचे प्रतिनिधी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आयुक्त शेखर सिंह पुढे म्हणाले, कॉलेज जीवनात अभ्यासाबरोबरच खेळ, कल्चरल इव्हेंटमध्ये सहभागी होणे गरजेचे आहे. यामुळे व्यक्तिमत्व विकास सर्वांगाने घडण्यास मदत होते. कोणत्याही स्पर्धा परीक्षा देताना विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी प्रयत्नशील रहायला हवे. स्पर्धा परीक्षा देताना वेळेची मर्यादा बांधून घेणे आवश्यक आहे. लोकसेवेत कार्यरत असताना अनेक गोष्टींचा त्याग करावा लागत असून त्यासाठी मनाची तयारी असणे आवश्यक आहे. स्पर्धा परिक्षेची तयारी करताना काय वाचू नये हे कळणे महत्त्वाचे आहे. रोजचे वर्तमानपत्र वाचल्याने नकळत आपल्या ज्ञानात भर पडत असते. सोशल मिडीयाचा वापर योग्य पद्धतीने करावा. स्पर्धा परीक्षेत अपयश आले म्हणून खचून न जाता आपल्या आवडत्या क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करायला हवे, मेहनत हा यशाचा खरा मार्ग आहे, असे त्यांनी सांगितले.

सहायक पोलिस आयुक्त श्रीकांत दिसले म्हणाले, कॉलेज जिवनात विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळी ऊर्जा असते. एखादे ध्येय मनापासून ठरवून त्यासाठी जिद्दीने प्रयत्न केले तर यशाचे शिखर नक्की गाठता येते. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना प्लान बी देखील तयार असावा. स्पर्धा परीक्षेत अपयश आले तरी स्वतःचा व्यक्तिमत्व विकास उत्तम झालेला असतो जो आपल्याला कोणत्याही क्षेत्रात यश मिळविण्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरतो.

फॉक्सबेरी टेक्नोलॉजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित भार्गव म्हणाले, यशस्वी उद्योजक होण्यासाठी नियोजन, बोलण्याची उत्तम कला, नेतृत्वगुण तसेच समस्या शोधून त्यावर मार्ग काढण्याची वृत्ती गरजेची आहे. प्रत्येक गोष्टीची मुलभूत माहिती असणे आवश्यक आहे. यशस्वी करिअर घडविण्यासाठी योग्य दिशा आणि सुरुवातीपासूनची तयारी महत्वाची ठरत असल्याचे भार्गव यांनी यावेळी स्पष्ट केले.

अनुक्रीत जोहारी म्हणाले, व्यवस्थापन क्षेत्रात करीयर घडविताना वेळेचे नियोजन आवश्यक आहे. देशात स्पर्धा वाढली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना करीअरचा प्रश्न निर्माण होत असून आपली वाट सक्षम असायला हवी, असे मत इंडियन इंस्ट्रीटयुट ऑफ मॅनेजमेंट, कोलकाता येथून शिक्षण पूर्ण केलेले आणि फार्मदीदी संस्थेचे सहसंस्थापक अनुक्रीत जोहारी यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. सोमनाथ पाटील यांनी तर सूत्रसंचालक पायल भार्गव यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन स्मार्ट सिटी व स्मार्ट सारथी टीमद्वारे करण्यात आले.