दि . १७ ( पीसीबी ) पुणे: पुण्यातुन मोठी बातमी समोर आली आहे. येथे पेट्रोलपंप लुटण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांना खडकी पोलिसांनी वाकडेवाडी येथील अंडरपास ब्रिजखाली मध्यरात्रीच्या सुमारास पकडले. त्यांची अधिक चौकशी केली असता हे चोरटे परप्रांतीय आहेत. पायी जाणार्या नागरिकांकडील मोबाईल हिसकविण्याचे गुन्हे करीत असल्याचे समोर आले. पकडलेल्या 9 चोरट्यांकडून खडकी पोलिसांनी 8 लाख रुपयांचे 30 मोबाईल जप्त केले आहेत.
अभिषेक राजकुमार महातो (वय 22 , रा. बिहार), दिनेश राजकुमार नोनिया (वय18, रा. कटियारा, बिहार), रोहनकुमार विलोप्रसाद चौरोसिया (वय 19, रा. महाराजपूर, जि. साहेबगंज, झारखंड), राजेश धर्मपाल नोनिया (वय 18, रा. बर्धमान, पश्चिम बंगाल), सचिन सुखदेव कुमार (वय 20 , रा. साहेबगंज, झारखंड), उजीर सलीम शेख (वय 19, रा. कटियारा, बिहार), अमीर नूर शेख (वय 19, रा. झारखंड), सुमीत मुन्ना महातोकुमार (वय 19, रा. झारखंड), कुणाल रतन महातो (वय 21, रा. कटियारा, बिहार) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पादचारी नागरिकांचे मोबाईल हिसकाविल्याची कबुली
याबाबत पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी मोठा बंदोबस्त लक्षात घेत नियोजन आखले. पोलीस दल अतिव्यस्त असल्याचा फायदा घेऊन मुंबई-पुणे रस्त्यावरील भारत पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीने एक टोळी वाकडेवाडी येथील अंडरपास ब्रिज खाली जमली असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले यांना सोमवारी (ता.14) मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून या टोळीला पकडले. त्यांची चौकशी केली असता पादचारी नागरिकांचे मोबाईल हिसकाविल्याची त्यांनी कबुली दिली. पोलिसांनी चोरट्यांकडून 8 लाख रुपयांचे 30 मोबाईल जप्त केले आहेत.
परप्रांतीय चोरटे…
चोरटे प्रामुख्याने बिहार, झारखंड,पश्चिम बंगाल येथील आहेत. पुण्यात मजुरी करत असताना त्यांची ओळख झाली. झटपट पैसे कमाविण्यासाठी त्यांनी नागरिकांकडील मोबाईल हिसकावण्याचे गुन्हे केल्याचे तपासात उघड झाले आहे.
सदर कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे, पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले, पोलीस हवालदार संदेश निकाळजे, अश्विनी कांबळे, आशिष पवार,पोलीस अंमलदार सुधाकर राठोड, अनिकेत भोसले, सुधाकर तागड, ऋषिकेश दिघे, दिनेश भोये, शशांक डोंगरे, प्रताप केदारी, गालीब मुल्ला, प्रवीण गव्हाणे, शिवराज खेड, मनिषा गाडे, तनुजा पाटील यांनी केली आहे.