‘खडकवासला जलाशय रक्षण अभियाना’द्वारे जलसंवर्धन आणि संस्‍कृतीरक्षण

0
285

पुणे,दि.०४ (पीसीबी) – हिंदु संस्‍कृतीतील प्रत्‍येक सण, उत्‍सव, व्रत पर्यावरणपूरक आणि आध्‍यात्‍मिक उन्‍नतीला पोषक आहेत; मात्र सण-उत्‍सवांमागील धर्मशास्‍त्र सर्वसामान्‍यांना अवगत नसल्‍याने उत्‍सवांमध्‍ये अपप्रकार शिरल्‍याचे दिसून येते. धर्मशिक्षणाच्‍या अभावी सण-उत्‍सव यांमागील मूळ उद्देशच लोप पावत चालला असून अपप्रकारांचा शिरकाव झाला आहे. धुलीवंदन आणि रंगपंचमी या दिवशी रासायनिक रंग लावून खडकवासला जलाशयात आंघोळीसाठी येणे, हा या अपप्रकारांमधीलच एक भाग ! यामुळे पुणे शहराला पाणीपुरवठा करणारा जलस्रोत प्रदूषित होतो, याचे रंगाने माखलेल्‍या युवावर्गाला भानही नसायचे. त्‍यामुळेच हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्‍था, खडकवासला ग्रामस्‍थ आणि अन्‍य समविचारी संघटना यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने गेली 20 वर्षे ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियान’ राबवले जात आहे. या उपक्रमाच्‍या अंतर्गत खडकवासला धरणाभोवती मानवीसाखळी करून प्रबोधन केले जाते. रंगांमुळे होणारे प्रदूषण, सण-उत्‍सवांमागचा उद्देश, ते साजरे करण्‍याची पद्धत यांविषयी प्रबोधन करण्‍यात येते.

या मोहिमेत प्रतीवर्षी स्‍थानिक प्रशासन, पाटबंधारे विभाग, पोलीस यांच्‍या वतीने पुष्‍कळ सहकार्य लाभत आहे. या मोहिमेच्‍या अंतर्गत यंदाचे हे 21वे वर्ष असून 7 मार्च (धुलीवंदन) आणि 12 मार्च (रंगपंचमी) या दोन्‍ही दिवशी प्रबोधनात्‍मक फलक हातात धरून सकाळी 9 पासून सायंकाळी 7 पर्यंत खडकवासला जलाशयाच्‍या भोवती मानवी साखळी करण्‍यात येणार आहे. या अभियानात सहभागी होण्‍यासाठी 89833 35517 या क्रमांकावर संपर्क करण्‍याचे आवाहन करण्‍यात आले आहे.

या पत्रकार परिषदेला हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले, रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर, ‘जैन सोशल ग्रुप महाराष्ट्र प्रदेश’चे उपाध्यक्ष दिलीपभाई मेहता हे मान्यवर उपस्थित होते.