खंडेनवमीची पूजा घेण्यास कामगारांकडून नकार; युनियनच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आंदोलन अधिक उग्र करण्याचा इशारा

0
398

पिंपरी , दि. ९ (पीसीबी) – एक्साईड बॅटरी लिमिटेड चिंचवड या कंपनीमध्ये कामगारांनी 4 महिन्यापूर्वी माजी उद्योगमंत्री, कामगार नेते आणि विद्यमान आमदार श्री सचिनभाऊ अहिर यांच्या महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघटना या नवीन युनियनची स्थापना केली. यापूर्वी गेले 25 वर्षे श्री. राजन नायर यांची युनियन होती. इतर प्लांट मध्ये बदली आदेशाच्या नावाखाली सुमारे 121 कामगारांच्या नोकरीवर घाला घालण्याचे नियोजन कंपनीचे होते त्यामुळे कामगारांनी युनियन बदलण्याचा निर्णय घेतला.

दरम्यानच्या काळात कंपनी व्यवस्थापनाने सूडबुद्धीने एकूण अकरा कामगारांना निलंबित केले आणि दहा कामगारांना हरियाणा बावळ येथे बदली आदेश देण्यात आले. आणि उर्वरित आतील कामगारांवर दबाव आणून दहशत आणण्याचे काम कंपनी तर्फे चालू आहे म्हणून जोपर्यंत कंपनी व्यवस्थापन केलेल्या सर्व कारवाया मागे घेऊन युनियनला चर्चेला बोलवत नाही तोपर्यंत त्यांच्या विरोधात सर्व कामगारांनी दिनांक 23/08/2022 पासून रोज हाताला काळया फिती बांधून निषेध नोंदविणे आणि कॅन्टीन वर बहिष्कार टाकणे या स्वरूपाचे आंदोलन सुरू केले. गेल्या 50 दिवसांपासून हे आंदोलन चालू आहे. जर व्यवस्थापनाने युनियनच्या मागण्या मान्य केल्या नाही तर हे आंदोलन अधिक उग्र करू असा इशारा संघटनेचे प्रदेश सचिव श्री ईश्वरजी वाघ साहेब यांनी दिला. दिनांक 26/08/2022 रोजी सर्व कामगारांनी कंपनी गेट पासून 800 मीटर अंतरावर निदर्शने केली तसेच.

‘ सचिनभाऊ नाही तर आम्ही नाही ‘

‘संघटना बदलली, आमचे काय चुकले ‘

‘ लढाई कामगारांच्या अस्तित्वाची ‘

‘ आज वेळ आमच्यावर आहे, उद्या कोणावरही येऊ शकते ‘

‘कामगार एकजुटीचा विजय असो ‘

‘ कारवाई थांबवा चर्चा करा ‘

अश्या पोस्टरबाजी केल्या आणि घोषणा दिल्या यावेळी युनियन कमिटी मेंबर्स श्री. दिलीप भोंडवे, श्री. सुनिल राजगुरू, श्री भाऊसाहेब कदम, श्री. आत्माराम धुमाळ, श्री. सुनिल परसे, श्री. निखिल शेटे, श्री. संतोष तापकीर, श्री. गोकुळ झुरूंगे आणि श्री. रवींद्र खराडे यांच्यासह बहुसंख्येने कामगार उपस्थित होते.
खंदेनवमी निमित्त युनियन च्या बोर्डाचे पूजन करण्यात आले त्या वेळी सर्व कामगार उपस्थित होते व दसऱ्याला मिळणाऱ्या स्वीट बॉक्स आणि खंडेनवमी ची पूजा घेण्यासाठी कामगारांनी नकार दिला आहे.