वडगाव मावळ, दि. 11 (पीसीबी) : गेल्या अनेक दिवसांपासून मावळातील तालुक्याचं गाव असेलल्या वडगाव मध्ये दिवसाआड विद्युत पुरवठा खंडित होत आहे आणि हा वीज पुरवठा फक्त एक दोन तास नव्हे तर तब्बल आठ ते दहा तास खंडित होत आहे. वडगाव मावळ सारख्या ठिकाणी अनेक शासकीय कार्यालये आहेत. मावळ तालुक्यातील बहुतांश व्यवहार याच गावातून चालतात. शासकीय कार्यालयांमध्ये जनरेटरची सुविधा असली तरी त्या शासकीय कार्यालयांवरती विविध लोकांचे छोटे मोठे व्यवसाय चालतात.
परंतु आता सारख्या सारख्या होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्यामुळे त्यांच्या व्यवसायांवरती गदा येऊन पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. आज वडगावातील कित्येक तरुण आयटी क्षेत्रांमध्ये वर्क फ्रॉम होम करत आहे. पण सारख्या सारख्या होणाऱ्या लाईटच्या प्रॉब्लेम मुळे आज त्यांच्या नोकऱ्या जाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
महावितरण चे कार्यकर्ते नेहमी कामाचे कारण सांगून विषय टाळून नेतात. परंतु विद्युत कामे करण्यासाठी इतके दिवस लागतात का ? असा प्रश्न आता निर्माण होतो. मध्यंतरीच्या काळात वडगावातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या खंडीत वीजपुरवठा विरोधात आंदोलन केले होते. यात अनेक नागरिकांनी सहभाग घेत आक्रोश मांडला. परंतु एवढं करून सुद्धा महावितरणाच डोकं फिरलेलंच दिसतं.
विद्युत पुरवठा वेळेवर जरी भेटत नसला तरी बिले मात्र वेळेवर येतात आणि एक दिवस जरी बिल भरण्यास उशीर झाला तरी दंड मागितला जातो. मग एवढं सगळं होऊन सुद्धा लाईट वेळेवर का भेटत नाही असा प्रश्न वडगावातील नागरिक विचारत आहेत.