खंडाळा बोगद्यात कंटेनर उलटला; पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प…!

0
346

खंडाळा,दि.०२(पीसीबी) – मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव वेगात असणारा कंटेनर खंडाळा बोगद्यात उलटला. या घटनेत दोन जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, कंटेनर रस्त्यावरच आडवा झाल्याने पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून सध्या ट्रेलर हटवण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात रस्ते अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. दररोज किरकोळ तसेच गंभीर स्वरूपाचे अपघात होत आहे. यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अपघात रोखण्यासाठी परिवहन विभाग शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. एकीकडे समृद्धी महामार्गावरील अपघातांच्या घटना वाढत असताना दुसरीकडे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर सुद्धा अपघात होत आहे.

बुधवारी दुपारच्या सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील खंडाळा घाटातील बोगद्यात भरधाव वेगात असलेला कंटेनर उलटला. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, कंटेनर बोगद्यात आडवा झाल्याने मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.