खंडणी मागत दुकानासह व्यावसायिकास जाळून टाकण्याची धमकी

0
499

चिंचवड, दि. २० (पीसीबी) – कापड व्यावसायिकाला खंडणी मागत खंडणी न दिल्यास दुकानासह जाळून टाकण्याची धमकी दिल्याचा प्रकार पिंपरी मार्केट येथे घडला. या प्रकरणातील एका आरोपीला खंडणी विरोधी पथकाने अटक केली. ही घटना ८ फेब्रुवारी आणि १४ एप्रिल रोजी घडली.

उमाकांत भगवान वाघमारे (वय १८, रा. लिंकरोड़, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह अतिश शिरसाट आणि त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सनी अशोक मोटवाणी यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पिंपरी मार्केट मध्ये कपड्याचे दुकान आहे. आरोपी फिर्यादी यांच्या दुकानात आले. त्यांनी फिर्यादीकडे दहा हजार रुपयांची खंडणी मागितली. हप्ता न दिल्यास दुकानासह जाळून टाकण्याची धमकी आरोपींनी फिर्यादींना दिली. त्यानंतर फिर्यादीकडून ५०० रुपये हप्ता घेतला. फिर्यादी यांच्या दुकानातून १३५० रुपयांचे तीन टीशर्ट आरोपींनी जबरदस्तीने घेतले.

याबाबत फिर्यादी यांनी खंडणी विरोधी पथकाकडे मदत मागितली असता पोलिसांनी माधव वाघमारे याला अटक केली. अन्य साथीदारांचा शोघ पोलीस घेत आहेत. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.