खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक

0
376

निगडी, दि. ११ (पीसीबी) – इथून प्रवासी वाहतूक करायची असेल तर प्रत्येक खेपेसाठी तीनशे रुपये द्यावे लागतील अशी धमकी देतकार चालकाकडे खंडणी मागितली याप्रकरणी निगडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे ही घटना रविवारी (दि. 9) चिंचवड स्टेशन चौक येथे घडली.

विनोद उर्फ विन्या देवेंद्र कामत (वय 42, रा. त्रिवेणीनगर, तळवडे), उदय उर्फ सर्वोदय शेट्टी (वय 48, रा. चिंचवड स्टेशन) अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत. याप्रकरणी संजय ज्ञानोबा वाघमारे (वय 42, रा. निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे फिर्यादी यांच्या तोंड ओळखीचे आहेत. फिर्यादी चिंचवड स्टेशन येथून कार मधून प्रवासी वाहतूक करतात. रविवारी रात्री साडेअकरा वाजता त्यांनी चिंचवड स्टेशन येथून प्रवासी भरले. त्यामुळे आरोपींनी जबरदस्तीने फिर्यादीकडे 300 रुपये खंडणी मागितली. त्यास फिर्यादींनी विरोध केला असता आम्हाला विचारल्या शिवाय चिंचवड स्टेशन येथे गाडी चालवायची नाही. अन्यथा प्रत्येक खेपेस 300 रुपये दे. पैसे दिले नाही तर तुला बघून घेईल अशी आरोपींनी धमकी दिली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.