खंडणीसाठी भंगार व्यावसायिकाचे अपहरण

0
112

भोसरी, दि. 14 जुलै (पीसीबी) – खंडणीसाठी तिघांनी मिळून एका भंगार व्यवसायिकाचे अपहरण केले. व्यावसायिकाकडून ऑनलाईन आणि रोख स्वरूपात एक लाख 55 हजार रुपये घेतले. ही घटना लंबोदर वॉशिंग सेंटर मोशी येथे घडली.

ब्रिजेश्याम राममिलन यादव (वय 49, रा. पूर्णानगर, चिखली प्राधिकरण) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बाळासाहेब बांगर, प्रवीण भालेराव आणि अशोक (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यादव यांना भंगारचा व्यवसाय करायचा असेल तर महिन्याला साडेतीन लाख रुपये खंडणी द्यावी लागेल, अशी मागणी केली. तसेच यादव यांना लंबोदर वॉशिंग सेंटर मोशी येथे बोलावून घेतले. त्यानंतर तिथून त्यांना जबरदस्तीने कार मध्ये डांबून चाकण, नाशिक फाटा व मोशी येथे आणले. कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्याकडून फोन पे वरून 55 हजार रुपये तर रोख स्वरूपात एक लाख रुपये घेतले. त्यानंतर यादव यांना मोशी येथे सोडून दिले. पुन्हा आरोपींनी यादव यांना फोन करून 50 हजार रुपयांची खंडणी मागितली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.