खंडणीसाठी तरुणावर चाकूने वार

0
123

पिंपरी, दि.४ (पीसीबी)

दरमहा तीन हजार रुपयांच्या खंडणीच्या मागणीसाठी तरुणावर चाकूने वार करण्यात आले. ही घटना वैदवस्ती, पिंपळे गुरव येथे सोमवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास घडली.

नशीमअली रोजअली शहा (वय 20, रा. भगतसिंग चौक, पिंपळे गुरव) असे चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी मंगळवारी (दि. 3) याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अक्षय दशरथ शिंदे ऊर्फ वल्या (वय 23, रा. धोत्रे चाळ, वैदवस्ती, पिंपळे गुरव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास फिर्यादी हे पिंपळे गुरव येथील इरफान कॅटरिंग नावाच्या दुकानात होते. त्यावेळी त्यांच्या तोंडओळखीचा आरोपी अक्षय हा तिथे आला. त्याने आपण येथील भाई असून या परिसरात धंदा करायचा असल्यास आपल्याला दरमहा तीन हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, असे सांगून भिती दाखविण्यासाठी चाकू काढला. त्यास पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने फिर्यादी नशीमअली याच्यावर पाठीत चाकूने वार केला. तसेच ममता स्वीट या दुकानासमोर उभे असलेलया कबीर महेंद्र कोल्हे या मुलाच्या मागे चाकू घेऊन लागला. तसेच चाकूचा धाक दाखवत परिसरात दहशत निर्माण केली. आरोपी अक्षय याच्यावर सांगवी पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल असून सांगवी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.