खंडणीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी 1 लाख 50 हजार मागणारा लाचखोर API जाळ्यात

0
270

पुणे, दि. १८ (पीसीबी) – खंडणीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी 1 लाख 50 हजार रूपये खाजगी व्यक्तीमार्फत घेतल्याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलिस अंमलदारासह खाजगी व्यक्तीला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने अटक केली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील निगडी पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या एपीआय आणि पोलिसावर अ‍ॅन्टी करप्शनचा ट्रॅप झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल प्रकाश कोरडे , पोलिस अंमलदार सागर तुकाराम शेळके आणि खाजगी व्यक्ती सुदेश शिवाजी नवले (43, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड, पुणे) अशी अ‍ॅन्टी करप्शनने अटक केलेल्यांची नाव आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार यांनी त्यांचे ओळखीचे इसमास हातऊसणे व बँकेमधुन कर्ज काढून पैसे दिले होते. सदरचे बँक कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे तक्रारदार यांनी त्यांचेकडे ऊसणे दिलेल्या पैशाची मागणी केली असता, तक्रारदाराच्या ओळखीच्या व्यक्तीने तक्रारदार यांच्या विरुद्ध निगडी पोलीस स्टेशन येथे तक्रार अर्ज केला होता. सदरचा अर्ज चौकशीकामी API अमोल कोरडे यांचेकडे असल्याने तक्रारदार यांचेविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी एपीआय अमोल कोरडे, पोलीस शिपाई सागर शेळके व खाजगी इसम नवले यांनी 1,50,000 रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी पुणे येथील अ‍ॅन्टी करप्शन येथे दिली होती.

तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीची पडताळणी केली असता, लोकसेवक सपोनि कोरडे व पोशि शेळके यांच्यावतीने खाजगी इसम नवले यानी 1,50,000 रुपयांची लाच मागणी केली व नवले यानी केलेल्या लाच मागणीस कोरडे व शेळके यांनी दुजोरा देवून सहाय्य केले. लाच रक्कम नवले याने स्विकारल्यावर तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पुणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलिस अधीक्षक शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपधीक्षक माधुरी भोसले, पोलिस निरीक्षक प्रविण निंबाळकर , पोलिस हवालदार नवनाथ वाळके, पोलिस अंमलदार सौरभ महाशब्दे, हिला पोलिस अंमलदार शिल्पा तुपे आणि चालक पोलिस अंमलदार पांडुरंग माळी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.