क्षेत्रिय कार्यालय स्तरावर स्वच्छ वॉर्ड स्पर्धा

0
320

पिंपरी,दि.०५(पीसीबी) – स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये पिंपरी- चिंचवड शहराने सहभाग घेतला असून महापालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या उपक्रमांतर्गत क्षेत्रिय कार्यालय स्तरावर स्वच्छ वॉर्ड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे मुल्यांकन स्वच्छता साधने, कचरा विलगीकरण सुविधा आदी निकषांच्या करण्यात येणार असून त्यानुसार स्वच्छ वॉर्ड निवडण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त हॉटेल्स, शाळा, गृहनिर्माण संस्था, मार्केट असोसिएशन, शासकीय कार्यालये व रुग्णालयांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी केले आहे.

स्वच्छ भारत अभियानामध्ये सर्व घटकांतील नागरिकांचा व्यापक सहभाग वाढविणे तसेच माहिती, शिक्षण आणि संवादाद्वारे वर्तनामध्ये बदल घडविण्याच्या दृष्टीने जनजागृती करणे हा स्वच्छ सर्वेक्षणाचा हेतू आहे. इच्छुकांनी आपण राहत असलेल्या नजीकच्या क्षेत्रिय कार्यालयातील आरोग्य विभागामध्ये स्पर्धेत सहभागी झाल्याबाबतचा अर्ज सादर करावा.

स्पर्धेतील सहभागी हॉटेल्स, शाळा, गृहनिर्माण संस्था, मार्केट असोसिएशन, शासकीय कार्यालये व रुग्णालये पिंपरी-चिंचवड शहरातीलच असणे आवश्यक आहे. या स्पर्धेचे मुल्यांकन केंद्र शासनाने दिलेल्या एसओपीव्दारे होणार आहे. स्वच्छ वॉर्ड स्पर्धेतील विजेत्यांना कोणत्याही स्वरुपाचे रोख बक्षीस देण्यात येणार नसून महापालिकेच्या वतीने प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे स्वच्छ भारत समन्वयक तथा सहायक आयुक्त विनोद जळक यांनी दिली आहे.

शहरातील स्वच्छ हॉटेल्स, शाळा, गृहनिर्माण संस्था, मार्केट असोसिएशन, शासकीय कार्यालये आणि रुग्णालयांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.