क्षीरसागर कुटुंबाचे घर जाळण्याच्या प्रकरणाचा तेली समाजाकडून निषेध

0
372

पुणे, दि. २ (पीसीबी) – बीड शहरात आंदोलकांनी तेली समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी कॅबिनेट मंत्री श्री जयदत्त क्षीरसागर, आमदार व महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवाआघाडी अध्यक्ष श्री संदीपजी क्षीरसागर यांच्या निवासस्थान,गाड्या व कार्यालयाला तसेच आमदार प्रकाशजी सोळंके,आमदार प्रशांत बंब यांच्या कार्यालयाची तोडफोड व आग लावल्याच्या प्रकरणाचा निषेध करण्यात आला आहे. तेली समाजाच्या शिष्टमंडळाने या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना निवेदन दिले. निवेदनाची प्रत निगडी येथील तहसिलदार अर्चना निकम यांना देण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे की, अत्यंत दु:खद अंतकरणाने खेद व्यक्त करीत आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की,आज महाराष्ट्रात जो मराठा आंदोलकांनी आरक्षणासाठी धूडगूस घालून महाराष्ट्र जाळायला घेतला आहे, या बेछूट, बेहोश व बेधुंदपणे आगी व जाळपोळीचा जो नंगानाच चालवला आहे त्याची झळ आमच्या समाजाचे राष्ट्रीय नेते जयदत्त क्षीरसागर व युवा आघाडीचे अध्यक्ष संदीपजी क्षीरसागर, बीड यांच्या निवासस्थानासह पाच- सहा गाड्या तसेच कार्यालयाला आगी लावून भस्मसात केले.घरामधील सर्वांना जिवंत जाळण्याचे षडयंत्र केले आहे. याशिवाय आमदार प्रकाशजी सोळंके, प्रशांत बंब, कुंडलिक खाडे यांचे सह अनेक अल्पसंख्यांक व मागासवर्गाच्या समाजाला देखील मराठा समाजाच्या आंदोलकांनी वेठीस धरून जाळपोळ केली. हे कृत्य अत्यंत घृणास्पद व निंदनिय आहे.

खरं तर मराठा आरक्षणाला सर्व ओबीसी समाज,अल्पसंख्यांक व मागासवर्गाने पाठिंबा दर्शवला आहे. ज्या मराठा समाजाच्या नेत्यांनी उदा. श्री नारायण राणे व श्री रामदास कदम ज्यांनी आरक्षणाला विरोध केला त्यांच्या विरोधात आंदोलन न करता आमच्या विरोधात त्यांनी आंदोलन करणं हे म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशीच नाही कां ? ज्या कोणी आंदोलकांनी ओबीसी समाजबांधवांची व अल्पसंख्यांकांच्या घरे, गाड्या व कार्यालये जाळली त्यांना ताबडतोब शोधून, अटक करून त्यांचेवर कलम ३०२ अन्वये कठोर कारवाई करावी. त्यांच्याकडूनच या बांधवांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई शासनाने द्यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा ही तेली (ओबीसी) समाजाची राज्यस्तरीय संघटना असून आज पावतो आम्ही मराठा आरक्षणाबाबत सदैव समन्वयाच्या भूमिकेमध्ये महाराष्ट्र शासनाशी बोलणी करीत आलेलो आहोत. २९ सप्टेंबर च्या महाराष्ट्र शासनाने बोलावलेल्या सभेमध्ये देखील याबाबत आम्ही आमची भूमिका मराठा समाजाला आरक्षण देण्याविषयी आमचे दुमत नाही परंतु, ते ओबीसीच्या तुटपुंज्या असलेल्या आरक्षणांमधून देऊ नये. त्यांना वेगळे आरक्षण द्यावे तसेच त्यांना सरसकट आरक्षणही देऊ नये, असे आम्ही स्पष्टपणे मांडली होती. शासनानेही त्याला मंजुरीही दिली होती. सामंजस्याची भूमिका घेऊनही जर तेली समाज, अल्पसंख्यांक, मागासवर्गीय व ओबीसी समाज हा मराठा आरक्षणासाठी मदत करत असतांना देखील जर मराठा समाजाच्या आंदोलकांनी विरोधकांना विरोध न करता आमच्या मदत करणार्‍या समाजांची घरे जाळत असतील तर हे बरोबर नाही, असे निवेदनात म्हटले आहे.

आंदोलकांच्या या चाललेल्या सगळ्या झोटिंगशाहीला व दडपशाहीला आम्ही तीव्र शब्दात निषेध करीत आहोत.आंदोलकांच्या या आक्रसताळेपणामुळे आमचा समाजच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक,मागासवर्गीय व ओबीसींना त्यांनी वेठीस धरले आहे. गांवकूस, खेड्यातील वरील बांधव आजमितीस बिल्कूल सुरक्षित नाही, अशी भिती व्यक्त केली आहे.

अल्पसंख्यांक,मागास समाजाला व ओबीसींना योग्य ती सुरक्षा पुरवण्यासाठी महाराष्ट्र शासनाला आदेश द्यावेत तसेच हे जर असेच चालू राहिले व सरकार तर्फे जर या गोष्टींना आळा घातला गेला नाही तर कृपया आपण महाराष्ट्रामध्ये “राष्ट्रपती राजवट” लागू करावी अन्यथा आम्हाला आमच्या आरक्षणासाठी व स्वसंरक्षणासाठी जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरावे लागेल आणि त्याला हे महाराष्ट्र शासनच जबाबदार असेल, असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी पिंपरी-चिचवङ महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा शहर जिल्हा अध्यक्ष अनिल धोंङीबा राऊत खानदेश तेली समाज अध्यक्ष श्री अनिल जयराम चौधरी, खानदेश तेली समाज महिला मंच मा. अध्यक्षा सौ शैला रमेश चौधरी , सौ सुनंदा दिलीप चौधरी, श्री भरत चौधरी श्री रमेश चौधरी समाज बांधव ऊपस्थित होते.